श्री धुंदीबाबा विद्यालय विद्यानगर म्हणजेच हमखास गुणवत्तेने पास होण्याची खात्री – प्रा. साळुंखे

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१४ जून । मेढा (ता. जावली) । सुनील आढाव ।स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद असलेले रयत शिक्षण संस्थेचे श्री धुंदीबाबा विद्यालय विद्यानगर म्हणजे हमखास पास होण्याची जणू खात्रीच. या शाळेतून ग्रामिण भागातील मुले तावून सुलाखूनच बाहेर पडतात. रयत शिक्षण संस्थेचे हे विद्यालय असल्यामुळे शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याकडे काळजीपूर्वक, आपुलकीने लक्ष देतात. शिक्षकवृंद देखील विद्यार्थ्यांना कोणतीच अडचण येऊ देत नाहीत, असे प्रतिपादन या शाळेत तब्बल 18 वर्षे सेवा दिलेले सेवानिवृत्त प्रा. भरत साळुंखे यांनी व्यक्त केले. तब्बल 20 वर्षानंतर इयत्ता 10 वीच्या 2003 सालच्या बॅचच्या स्नेहसंमेलन सोहळ्याचे तसेच गुरुवंदन सोहळ्याचे आयोजन माजी विद्यार्थ्यांनी केले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रा. साळुंखे बोलत होते. पुन्हा एकदा मला शाळेत जायचंय असा हट्ट धरत, श्री. धुंदीबाबा विद्यालय विद्यानगर माध्यमिक शाळेच्या सन 2003 च्या इयत्ता 10 वीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा तो वर्ग भरविला. शाळेतील शिस्त, मागच्या बाकावर केलेली मस्ती आणि विद्यार्थ्यांना चूक केल्याबद्दल शिक्षकांनी केलेली शिक्षा अशा भरगच्च आठवणींची शिदोरी घेऊन तब्बल 20 वर्षानी एकत्र येत जुन्या त्या सोनेरी आठवणींना उजाळा दिला. तसेच शिक्षकांची अनेक वर्षानंतरची आदरयुक्त भावनिक भेट सर्वांना सुखावून गेली.

यावेळी बोलताना साळुंखे पुढे म्हणाले की, या शाळेच्या आरसीसी इमारतीसाठी माझ्यासह माझ्या सहकार्यांनी खूप खस्ता खाल्ली आहे. वाळूपासून सिमेंटपर्यंत काटकसरीने साहित्याचे नियोजन करून ही आरसीसी इमारत उभी केली. अनेक ग्रामस्थांनी यासाठी आपले योगदान दिले. कित्येकांनी आर्थिक मदत देखील केली. इयत्ता दहावीमध्ये गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांकाने पासआऊट झालेल्या कांचन कदम या विद्यार्थीनीचे कौतुक करताना साळुंखे सर म्हणाले की, लोखंडाला भट्टीतून जसे ताऊनसुलाखून काढले जाते. तेव्हाच कुठे धारदार तलवार तयार होते. अगदी तशीच विद्यादानाच्या भट्टीतून हिला तावून सुलाखून काढली आहे. त्यामुळे आज ही विद्यार्थिनी पाटण तालुक्यातील पाडळोशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. यावेळी आपल्या माजी पत्रकार विद्यार्थ्याचे कौतुक करताना म्हणाले की, सर्वात मोठा परमेश्वर पत्रकार असतो. एखाद्याला उच्चस्थानी पोहोचवू शकतो किंवा भुईसपाट देखील करू शकतो. 2003 साली विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या रात्र अभ्यासिकेसारखा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. हा अभिनव उपक्रम साळुंखे सर यांच्या सकल्पनेतूनच साकारला गेल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती, दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती या कवितेप्रमाणे तब्बल 20 वर्षानंतर शाळेतून दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी बाहेर पडलेले माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यानिमित्त एकत्र आले व सोनेरी आठवणींना उजाळा दिला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षपद शाळेचे मुख्याध्यापक श्री. जाधवसर तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भरत साळुंखे सर व भारती साळुंखे या दांपत्यांने भूषिवले. शाळेतील शिक्षक वृंद यांचा यावेळी सत्कार करून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ग्रंथपाल विद्यालयाचे मुख्याध्यापक जाधवसर, खाडेसर, क्रीडा शिक्षक करंजे सर, भूमितीचे निकम सर, मराठीचे लोहार सर, चित्रकला शिक्षक शिंदे डी. आरसर, गणिताचे अक्षय पवार, लेखपाल शेडगे सर आदींची प्रामुख्याने उपस्थिती लाभली. यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही आपले मनोगत व्यक्त करत जुण्या आठवनींना उजाळा दिला. व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मनोगते यावेळी व्यक्त होताना शिक्षक व माजी विद्यार्थी भाऊक झाल्याचे पहायला मिळाले. यावेळी सर्वांनी चवीष्ट जेवनाचा पुरेपुर आनंद घेतला.
शाळेच्या प्रांगणात माजी विद्यार्थिनींनी आकर्षक रेखाटलेली रांगोळी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. यासाठी चित्रा शिंदे व कांचन कदम या दोघींनी मेहनत घेतली.

आजच्या धावपळीच्या व तंत्रज्ञानाच्या टेक्नोसॅव्ही युगात विविध ठिकाणाहून सर्वांना एकत्र करणे फार जिकीरीचे होते. मात्र विद्यालयाचे माजी विद्यार्थी क्रीडापटू ज्ञानेश्वर सुळके, दीपक शिंदे, अनिल महामुलकर, कांचन कदम, गौरव जाधव, मच्छिंद्र गोळे, सचिन पवार अनुप्रिता चिकणे यांनी ही जबाबदारी अगदी लिलया पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक शिंदे यांनी केले तर आभारप्रदर्शन कांचन कदम-सुतार यांनी केले.

कार्यक्रमाला उपस्थित माजी विद्यार्थिनी…
सदर कार्यक्रम यशस्वितेसाठी चित्रा शिंदे, कांचन कदम-सुतार, अनुप्रिता चिकणे, आश्विनी भोईटे-जाधव, पवित्रा चिकणे-दिवडे, पल्लवी शिंदे-बोबडे, रेश्मा धनावडे-चौधरी

कार्यक्रमाला उपस्थित माजी विद्यार्थी
कृषी अधिकारी अनिल महामुलकर, अमोल महामुलकर, गौरव जाधव, अक्षय ससाणे, दीपक शिंदेसर, प्रवीण शिंदे, नवनाथ हिरवे, रणजीत शिंदे, सचिन पवार, चंद्रकांत शिंदे, संदीप शिंदे, सोनगावचे प्रगतशील शेतकरी विजय दुदुस्कर, पत्रकार सुनील आढाव आदींनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शविली.

———————-

काय काय म्हणाले गुरुजन
समाजातील मुलांना विद्यादान हे निपक्षपातीपणाने केले तरच स्वताची मुले शुशिक्षीत बनतात. आज मी जी सेवा केली ती निर्मोही मनाने केली. त्यामुळे माझ्या मुलांचे करिअर मी घडवू शकलो.
– शिंदे डी. आर. कलाशिक्षक

पती-पत्नीमधील गोड संवाद हाच खरा संसार. माझे विद्यार्थी आज जीवनात यशस्वीपणे संसार करत आहेत. याचा मला मनस्वी आनंद आहे. या मुलांच्या भावी आयुष्याला माझ्याकडून खूप खूप सदिच्छा.
– तानाजी करंजे

श्री धुंदीबाबा विद्यालयात मी भूमिती शिक्षक म्हणून कार्यरत होतो. माझे सर्वच विद्यार्थी चांगल्या गुणांनी पासआऊट झाले. त्यानंतर मी एका शाळेवर पर्यंवेक्षक म्हणून रुजू झाले. व पुढे मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालो. या कालावधीत या शाळेचे विद्यार्थी फारच गुणी होते.
नीकम सर

श्री धुंदीबाबा विद्यालय विद्यानगरचे विद्यार्थी सोन्यासारखे भेटले. मी या शाळेवर हिंदी हाच विषय शिकवायचे. असे विद्यार्थी मला कुठे भेटले नाहीत. मी आज ज्या शाळेवर कार्यरत आहे तिथल्या राजकारणात मी जास्त लक्ष देत नाही. मुलांनो आपल्या मुलाबाळांकडे लक्ष द्या.
-सौ. भारती साळुंखे

मी या शाळेवर ग्रंथपाल म्हणून सुरुवातीपासूनच कार्यरत आहे. मला मिळेत तो विषय मी शिकवायचो सुरुवातीला. या बॅचच्या विद्यार्थ्यांचे मला विशेष कौतुक आहे. कारण ग्रंथपाल म्हणून काम करताना हे विद्यार्थी अनेक पुस्तके वाचायला घेऊन जायचेत.
-खाडे सर

विद्यार्थ्यांचे दाखले देणे, तसेच त्यांना लागणारी प्रमाणपत्रे देण्याचे काम मी चोखपणे करत असतो. शालेय प्रशासकीय कामकाज करत असताना या बॅचच्या विद्यार्थांची सर्व डॉक्युमेंटस अपडेट ठेवणे यांसारखी महत्त्वपूर्ण जबाबदारी मी पार पाडत असतो.
– शेडगे सर, लेखापाल

काय काय म्हणाले माजी विद्यार्थी
मला या शाळेने खूप काही दिले. साळुंखे सर व मॅडम माझ्यासाठी माझी विठ्ठल रखुमाई. आईच्या पदरानंतर मी साळुंखे मॅडम यांचा पदर घेऊन माझी शैक्षणिक कारकीर्द पूर्ण केली. त्यांच्यामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचलो.
– दीपक शिंदे, मुख्याध्यापक,
विद्या व्हॅली स्कूल, चाकण, पुणे

आज गुरवंदन सोहळा. शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. विद्यार्थी दशेत शिकत असताना भूमिती, गणितातील सूत्रे अनेकांच्या डोक्यावरून जातात. अनेकांना असे वाटते की या सूत्रांचा आपल्या जीवनात काय उपयोग होतो का. पण मी एक सांगतो, पृथ्वी गोल फिरते. ती दिसते का…त्याचप्रमाणे कुठे ना कुठे तरी गणिती सूत्रांचा जीवनात उपयोग होतोच. शाळेने मला भरभरून दिले. मी कायम ऋणात राहीन. हसत हसत जगा. मकरंद टिल्लू सांगतात
-अनिल महामुलकर, कृषि अधिकारी , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, सातारा

माणसं ओळखू त्यांच्या सानिध्यात राहणे ही शिकवणच जणू मला या शाळेने दिली. कर्मवीरांचे पाईक होताना देण्यामध्ये जे सुख आहे तेच देण्यामध्ये दुःख आहे. आयुष्यात लेबल लावून मुखवटे कधीच धारण करु नका. अज्ञानी का प्यार हानिकारक हो सकता हैं, लेकिन ज्ञानी का क्रोध कभी हानिकारक नहीं हो सकता. स्त्री ही जगाची उद्धारार्थी आहे. आपली मुले हीच आपली संपत्ती आहे. त्यांना संस्कारक्षम आयुष्य जगवायला शिकवा. सिद्धहस्त कवी प्रा. अनंता राऊत म्हणतात. दुःख अडवायला उंबर्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा.
कांचन कदम-सुतार,
उपशिक्षिका, जि. प. प्राथमिक शाळा, पाडळोशी, तालुका पाटण, जिल्हा-सातारा

मी या श्री धुंदीबाबा विद्यालय विद्यानगर या शाळेत येण्यापूर्वी हातगेघरमुरे या शाळेत शिकत होतो. मात्र त्या ठिकाणच्या शिक्षणाचा दर्जा खालावलेला होता. मी दोन वेळा नापास झालो. तेच या शाळेच प्रवेश घेतला आणि गुणवत्तापूर्ण पासआऊट झालो. रयत शिक्षण संस्थेत जे शिक्षण मिळते ते कुठेच मिळत नाही. म्हणून ही शाळा मला खूप खूप काही देऊन गेलीय. मला खूप खूप आवडते.
-मच्छिंद्र गोळे, एमआयडीसी कामगार नेते, शिरवळ

अशी पाखरे येती. सुमारे 20 वर्षांनी आम्ही सर्वजण एकत्र आलो. फार आनंद झाला. साळुंखे सरांनी माझे बालपण पाहिले आहे. नॉर्मली कसे असते सर्वजण पहिल्यांदा शिक्षण घेतात. करिअर करतात मग लग्न करतात. माझ्या बाबतीत मात्र उलट झाले. पहिल्यांदा माझे लग्न झाले. नंतर शिक्षण घेतले. इतर शाळांत भेदभाव केला जातो. पार्सिलीटी पहायला मिळते. मात्र धुंदीबाबा विद्यालयात शिक्षक-विद्यार्थी नाते कौटुंबिक असते. ही वास्तवता मी प्रत्यक्षात अनुभवली आहे.
-अनुप्रिता चिकणे-साळुंखे, माजी विद्यार्थिनी

सर्वच शिक्षकांनी आम्हाला खूप चांगले शिकवले. गणिताच्या शिक्षकांनी जी शिदोरी दिली त्याच शिदोरीच्या जोरावर मी माझ्या कार्यक्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. सर्व शिक्षकांचे हे ऋण न फेडण्यासारखेच आहेत. शिक्षकांचा मी लाडका विद्यार्थी होतो. विद्यार्थी दशेत क्रीडा स्पर्धेत मी सदा अग्रेसर असायचो.
धावण्याची स्पर्धा असो वा कुस्ती वा कबड्डी मी उत्साहाने सहभागी व्हायचो. या कार्यक्रमाचे मी आयोजन केले. कार्यक्रमाला उपस्थित शिक्षण तसेच सहकारी विद्यार्थी यांचे मनपूर्वक आभारी आहे.
– ज्ञानेश्वर सुळके, गरवारे टेक्निकल फायबर्स, वाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *