राज्यभरात काळे ढग ;मात्र पाऊस नाही

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१४ जून । कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील भागात दाखल झाल्यानंतर सोमवारी (१३ जून) सकाळी मान्सूनने सह्याद्री ओलांडून मराठवाड्यासह मध्यवर्ती भागाकडे झेप घेतली आहे. सध्या मान्सून कमकुवत असल्याने बुधवार (१५ जून) पर्यंत राज्यातील सर्वच भागात तो दाखल होण्याचा अंदाज आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी काळे ढग दाटून येत आहेत, परंतु पाऊस कोसळत नसल्याचेही चित्र आहे.

बुधवार (१५ जून) पर्यंत मान्सून संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ, दक्षिण मध्य प्रदेशचा काही भाग व्यापणार आहे. तर मान्सूनची दुसरी बंगालची उपसागरीय शाखाही दोन दिवसांत आंध्र, तेलंगणा ओलांडून ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंडच्या काही भागात पोहोचण्यास अनुकूल स्थिती आहे. दोन्ही शाखा एकत्रित पुढे मिसळून वाटचाल करण्याची शक्यता आहे. सोमवारी (१३ जून) कोकणात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. विदर्भात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज असल्याने तेथे वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

उत्तरेत पर्यटकांची पावसाने गैरसोय होण्याची शक्यता
आगामी आठवड्यात नवीन येऊ घातलेल्या पश्चिमी प्रकोपामुळे कदाचित अवकाळी पावसाचा सामना उत्तर भारतात गेलेल्या आणि जाण्याच्या तयारीत असलेल्या पर्यटक व चारधाम यात्रेकरूंना करावा लागू शकतो.

वारीच्या उत्तरार्धात होणार पावसासोबत वाटचाल
सध्या राज्यात पालख्या पंढरपूरकडे प्रयान करत असून पूर्वार्धातील पहिले १० दिवस सोयीचे तर उत्तरार्धातील दिवसांत मात्र वारकऱ्यांना पावसासोबत वाटचाल करावी लागेल, असा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *