महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१४ जून । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुण्यातील लोहगाव विमानतळावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. त्यानंतर मोदी यांच्या हस्ते देहूतील संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मोदींनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, विठ्ठल-रुख्मिणी यांचे दर्शन घेतले. लोकार्पण सोहळ्यासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे.
तुकारामांनी भागवत धर्माला जागृत केले
यादव साम्राज्य संपल्यानंतर संपूर्ण समाज छिन्नविछिन्न झाला होता. कर्मकांड, बुवाबाजीचे स्तोम माजले होते. शोषण सुरू होते. त्यावेळी भागवत धर्माची पताका हाती घेऊन संतांनी महाराष्ट्र धर्माला जागृत केले. ज्ञानेश्वर माऊलींनी पाया रचला. त्याचा कळस तुकाराम महाराज झाले, असे मत यावेळी फडणवीसांनी व्यक्त केले.
400 वारकऱ्यांसोबत लोकार्पण सोहळा
नरेंद्र मोदी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत हेलिकॉप्टरने देहूत आले. यासाठी झेंडे मळा येथे 3 हेलिपॅड तयार करण्यात आले. तेथून मोटारीने माळवाडी, परंडवाल चौक, मुख्य कमान मार्गाने ते 14 कमानीजवळ पोहोचले. तेथून ते पायी मंदिराजवळ गेले. येथे 400 वारकऱ्यांसमवेत शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्यानंतर मोदींनी सभेला संबोधित केले.
पीएमपीकडून 20 ई-बसेस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू गावातील तुकोबांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा झाला. यानंतर देहू येथील माळवडी येथे पंतप्रधानांची सभा झाली. पण, सभास्थळ ते वाहनपार्किंग हे अंतर साधारण दीड किलोमीटर अंतर आहे. त्यामुळे नागरिकांना सभास्थळी जाण्यासाठी पीएमपीच्या 20 ई-बस सोडण्यात आल्या होत्या.