महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१६ जून । गुगलने त्यांची इन्स्टंट मेसेजिंग सेवा गुगल टॉक हँगआउट (Google Talk Hangout) बंद करण्याची घोषणा केल्याची माहिती ‘अँड्राइड पोलीस’च्या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. 2005 मध्ये लाँच करण्यात आलेल्या ‘जी टॉक’चं काम कंपनीने मागील काही दिवसांपासून थांबवलं होतं. युजर्सनी गुगल हँगआउटवरून शिफ्ट व्हावं, असा सल्ला 2017 मध्येच देण्यात आला होता. या मेसेजिंग अॅपला Pidgim आणि Gajim सारख्या थर्ड पार्टीकडून चालवलं जात होतं. परंतु, आता 16 जून 2022 पासून ही सेवा पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.
गुगलने GoogleTalks ही सेवा 2005 मध्ये लाँच केली होती. त्यावेळी स्काइप (Skype) आणि एमएसएनशी (MSN) याची थेट स्पर्धा होती. कंपनीने यात व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलचं फीचर दिलं होतं. काही काळ ही सेवा प्रसिद्ध होती. परंतु, 2017 मध्ये युजर्सना गुगल हँगआउटवरून शिफ्ट होण्याचा सल्ला दिला गेला. 2020 मध्ये गुगल हँगआउटला गुगल चॅटच्या रूपात आणून या सेवेचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी हँगआउटमध्ये ‘गुगल चॅट फॉर वर्कस्पेस’ असा बदल करण्यात आला. आता गुगल टॉक बंद केलं जाणार असल्याची घोषणा गुगल सपोर्ट पेजवर करण्यात आली आहे. आता थर्ड पार्टी अॅपलाही हे सपार्ट करणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. 16 जूनच्या नंतर ही सेवा साइन इन करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास ‘एरर’ दिसेल.
गुगल टॉक हँगआउटसह मायक्रोसॉफ्टचा लोकप्रिय असलेला वेब ब्राऊझर ‘इंटरनेट एक्सप्लोरर’ (Web Browser Internet Explorer) सेवा 15 जून 22 पासून बंद होत आहे. 27 वर्षांअगोदर म्हणजेच 1995 मध्ये पर्सनल कॉम्युटरसाठी विंडोज 95 सोबत इंटरनेट एक्सप्लोरर सेवा सुरू झाली होती. याचा वापर करण्यासाठी सुरूवातीला युजर्सला याचे पैसे द्यावे लागत होते. नंतर मात्र ही सेवा मोफत करण्यात आली. मायक्रोसॉफ्टने दिलेल्या माहितीनुसार, इंटरनेट एक्सप्लोररचा वापर करणाऱ्या युजर्सना आता सर्व सुविधा ‘मायक्रोसॉफ्ट एज’ या ब्राउझरवर (Microsoft Edge) मिळणार आहेत. ही सेवा अधिक गतिशील आणि सुरक्षित आहे. याचं वैशिष्ट्यं म्हणजे, मायक्रोसॉफ्ट एजमध्ये युजर्सना इंटरनेट एक्सप्लोरर मोडही मिळणार आहे. याद्वारे युजर्स एक्सप्लोररवर उत्तम अॅप आणि वेबसाइटचा थेट वापर करू शकतील.
एका व्यक्तीसोबत किंवा समूहासोबत जोडलं जाण्यासाठी इन्स्टंट मेसेजिंग सेवा गुगल टॉक हँगआउटला लाँच करण्यात आलं होतं. मोबाईल, डेस्कटॉपवर व्हिडिओ आणि व्हॉइस कॉल करण्यासाठी याचा उपयोग होत होता. परंतु आता ही सेवा वापरणं बंद होणार असून याचा वापर करण्याचा प्रयत्न केल्यास ‘एरर’ असा संदेश दाखवला जाणार आहे. गुगल टॉक हँगआउटऐवजी युजर्सना इतर पर्याय वापरावे लागणार आहेत.