महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई : करोनाचा फैलाव वाढत असल्याने लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधताना १४ मे नंतर लॉकडाउनचा कालावधी १९ दिवसांनी वाढवण्यात आल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर रेल्वेनेही प्रवासी वाहतूकीवरील निर्बंध ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ३ मेपर्यंत देशामध्ये रेल्वे सेवा बंद राहणार आहे. मुंबईतील लोकल ट्रेनची वाहतूकही त्यामुळे बंदच राहणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी मालगाड्या मात्र सुरु राहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ एप्रिल रोजी पहिल्यांदा २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली होती त्यानंतर लगेचच रेल्वेनेही प्रवासी रेल्वेसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. हाच कालावधी आता रेल्वेने ३ मेपर्यंत वाढवला आहे. २१ दिवसांच्या लॉकडाउन १४ एप्रिल रोजी संपणे अपेक्षित होते. त्यामुळेच १५ एप्रिलपासून रेल्वेचे तिकीट उपलब्ध होत असल्याने १४ तारखेनंतर रेल्वे सेवा सुरु होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र आज मोदींनी लॉकडाउनचा कालावधी १९ दिवसांनी वाढवल्यानंतर रेल्वेनेही पुढील १९ दिवस प्रवासी वाहतूक सुरु न करण्याचा निर्णय घेतला आहे.