कितीही नोटीसा पाठवल्या तरीही घाबरणार नाही ; एकनाथ शिंदें

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२४ जून । महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्याची प्रक्रिया सुरूच आहे. शुक्रवारी सकाळी मुंबईतील शिवसेनेचे आणखी दोन आमदार गुवाहटीला रवाना झाले. त्यात चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे आहेत. उरलेले आणखी 5 अपक्ष आमदार सायंकाळपर्यंत शिंदेंसोबत येऊ शकतात.

शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे 39 आमदार आणि 14 अपक्ष आहे. म्हणजेच, 53 आमदारांसह शिंदे यांची शिवसेना मजबूत होत आहे. आमदारांची संख्या आणखी वाढू शकते.

मी घाबरणार नाही

माझ्याकडे 50 पेक्षा जास्त आमदार आहेत. दोन तृतीयांशापेक्षा जास्तीचे आमदार आमच्याकडे असून, त्याची रणनीती ठरवण्यासाठी आज बैठक होणार आहे. सगळे निर्णय बैठकीनंतर घेतली जातील. शिवसेनेकडून 10 नोटीसा आल्या तरी आम्ही घाबरत नाहीत. अशा प्रकारच्या चुकीच्या नोटीसा पाठवून आम्हाला घाबरवण्याचे प्रयत्न करू नये, बाळासाहेंबाची महाशक्ती आमच्या पाठिशी आहे, असा इशारा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी स्वतःला विधिमंडळ पक्षनेते म्हणून घोषित केले आहे. त्यांनी तशा आशयाचे उपसभापती नरहरी झिरवाल यांना एक पत्र पाठवले असून, त्यात त्यांच्या समर्थनार्थ 37 आमदारांच्या सह्या आहेत. शिंदे यांनी या पत्राची प्रत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि विधान परिषदेचे सचिव राजेंद्र भागवत यांनाही पाठवली आहे.

आपल्यासोबत 49 आमदार असल्याचा दावा शिंदे करत आहेत. रात्री उशिरा आणखी काही आमदारही गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. एकूणच शिंदे यांची शिवसेना मजबूत होत आहे. बहुधा शिंदे आज भाजपसोबतच्या युतीबाबत काही मोठी घोषणा करण्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *