महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२४ जून । ज्यांना आमचा सामना करायचाय त्यांनी मुंबईत यावे. आम्ही हार मानणाऱ्यातले नसून आम्ही जिंकणारच असं थेट आव्हान एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांना दिलं आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. बैठक संपल्यानंतर बाहेर पडलेल्या संजय राऊत यांना पत्रकारांनी गराडा घातला. यावेळी बोलताना राऊत यांनी आता लढाई कोणतीही असो ती आम्हीच जिंकणार असा दृढ विश्वास व्यक्त केला.
आज झालेल्या बैठकीला शिवसेनेचे खासदार अनिल देसाई, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर बोलताना संजय राऊत म्हणाले की मी तुम्हाला यशवंतराव चव्हाण यांच्या साक्षीने आणि हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करून सांगतो की हम हार माननेवाले नही. हम जितेंगे. फ्लोअर ऑफ द हाऊसवर जिंकू, लढाई रस्त्यावर झाली तर तिथेही जिंकू. ज्यांना आमचा सामना करायचाय त्यांनी मुंबईत यावे. बंडखोरांनी चुकीचे पाऊल उचलले असून आम्ही त्यांना परत येण्याची संधीही दिली होती, मात्र आता वेळ गेली आहे, असे राऊत यांनी म्हटले.