![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२४ जून । धाडसी निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्राचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मोठी घोषणा केली आहे. आता देशात लाँच होणाऱ्या गाड्यांना सुरक्षा तपासण्यासाठी परदेशात जावे लागणार नाही, तर भारतात आपल्या कार किती सुरक्षित आहेत, याची क्रॅश टेस्ट करता येणार आहे.
गडकरींनी शुक्रवारी Bharat-NCAP या भारताच्या नव्या कार असेसमेंट प्रोग्रॅमला हिरवा झेंडा दाखविला आहे. नव्या ड्राफ्टला मंजुरी दिली आहे. यानुसार कारना क्रॅश टेस्टमध्ये त्यांच्या प्रदर्शनानुसार सेफ्टी रेटिंग दिली जाणार आहे.
गडकरी यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. भारत एनकॅप हा एक ग्राहक केंद्रीत मंच असणार आहे. जो ग्राहकांना सुरक्षित कारची निवड करणे, सुरक्षित वाहने बनविण्यासाठी कंपन्यांमध्ये हेल्दी प्रतिस्पर्धा वाढविणे आणइ नवीन नियमांवर वाहने अधिकाधिक सुरक्षित करणे आदी सेवा देण्यास मदत करणार आहे.
भारत एनकॅपद्वारे कारची सुरक्षा व्यवस्था ही भारतीय ग्राहकांसाठीच नाही तर भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राला निर्यातीयोग्य वाहने बनविण्यासही महत्वाची ठरणार आहे. या चाचण्या ग्लोबल एनकॅपच्या नियमांसारख्याच असणार आहेत. भारतातील कंपन्या या ठिकाणी आपल्या कार टेस्ट करू शकतात. ऑटोमोबाईल उद्योगाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी एक महत्वाचे पाऊल आहे. तसेच भारताला ऑटोमोबाईल हब बनविण्याच्या दृष्टीने महत्वाचे असल्याचे गडकरी म्हणाले.
नितीन गडकरी यांनी या वर्षी मार्चमध्ये संसदेत भारत-एनसीएपी कार्यक्रमाची माहिती दिली होती. स्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय इंडिया न्यू कार असेसमेंट प्रोग्राम अंतर्गत कारच्या स्टार रेटिंगची चाचणी आणि मूल्यांकन करण्यासाठी एक योजना तयार करत आहे, असे त्यांनी एका लेखी प्रश्नाला उत्तर दिले होते.