महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२५ जून । शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी करणाऱ्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्यात यावं अशा आशयाची मागणी शिवसेनेकडून उपाध्यक्षांकडे करण्यात आली आहे. या १६ आमदारांना त्यांची बाजू मांडण्यासाठी ४८ तासांची मुदत देण्यात आली आहे. या आमदारांनी त्यांचं मत न मांडल्यास त्यांना अपात्र ठरववलं जाईल, असं शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणाले. आता बंडखोरांना शिवसेनेचं कवच सोडावं लागेल. आजपासून सर्वांना नोटिसा जातील. त्यांना बाजू मांडण्यासाठी सोमवारपर्यंत वेळ आहे. त्यांना नोटिशीला उत्तर द्यावं लागेल, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते.
बंडखोरी आमदारांना पक्षात घ्यायचं की नाही याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील. या आमदारांचा एक वेगळा गट होऊ शकत नाही. त्यांना भाजपमध्ये विलिनीकरण करावं लागेल. आम्ही कट्टर शिवसैनिक असल्याची डायलॉगबाजी बंडखोर मंडळी करत आहेत. विलिनीकरणानंतर ती डायलॉगबाजी बंद होईल, असा टोला सावंत यांनी लगावला.