महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२५ जून । महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत सरकार स्थापन करण्याच्या मागणीसाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३७ आमदारांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळेल, अशी शक्यता वर्तविली गेली. पण, एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटविल्यानंतर बंडखोर आमदारांचा संपूर्ण गट (शिवसेनेच्या एकूण आमदारांपैकी दोन तृतियांश) दुसऱ्या पक्षात विलीन करणे किंवा शिवसेनेतच राहणे अथवा राजीनामा देणे, हे तीन पर्याय राहिल्याचे शिवसेनेच्या टेक्निकल टिमने स्पष्ट करीत जिल्हाप्रमुखांच्या मनातील संभ्रम दूर केला.
शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांना दुसऱ्या पक्षात विलीनच व्हावे लागले होते. पक्षप्रमुखांनी अर्ज केल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष त्या आमदाराची निवड गटनेता म्हणून करतात. पण, एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांची हाकलपट्टी करून तात्काळ अजय चौधरी यांची निवड गटनेते म्हणून करण्यात आली. विधानसभा उपाध्यक्षांनी त्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांनी गट तयार केला, तरीही त्याला मान्यता मिळणार नाही. आता त्यांचा संपूर्ण गट दुसऱ्या पक्षात विलीन करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. विधानसभेत बहुमत सिध्द करण्याची वेळ आल्यास तुम्ही कोणत्या पक्षाचे विचारल्यानंतर त्यांना विशिष्ट पक्षाचे नाव सांगावेच लागणार आहे. त्यामुळे सध्याचा पेच फारकाळ राहणार नाही, असा विश्वास पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या टेक्निकल टीमने राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांना दिला.