आता सत्तास्थापनेच्या हालचालींना मिळणार गती ; राज्यपाल कोश्यारी राजभवनात परतले!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२६ जून । शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मोठा भूकंप झाला आहे. आपल्याकडे शिवसेनेचे (Shivsena) बहुतांश आमदार असल्याचा दावा शिंदे करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार धोक्यात आल्याची चिन्हे आहेत. तिन्ही पक्षातील महत्त्वाचे नेतेमंडळी सरकार वाचवण्यासाठी जमेल ते प्रयत्न करत आहेत. असे असताना कोरोनाग्रस्त असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तंदुरुस्त होऊन आजच राजभवनात (Rajbhavan) परतले आहेत. त्यामुळे आता नव्या सत्तास्थापनेच्या प्रक्रियेला गती मिळू शकते असे बोलले जात आहे.

राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गेल्या आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. कोश्यारी रूग्णालयात दाखल झाले असताना त्यांच्या कामाचा पदभार गोव्याच्या राज्यपालांकडे देण्यात येणार असल्याचे वृत्त होते. परंतु, राज्यपाल कोश्यारींचा कार्यभार इतर कोणाकडेही दिला जाणार नाही असे राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. आता कोविडमधून पूर्णपणे तंदुरूस्त होऊन राज्यपाल कोश्यारी रूग्णालयातून डिस्चार्ज घेऊन आजच राजभवनात परतले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना बुधवारी कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान होते. उपचारांसाठी त्यांना मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळीच राज्यपालांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती राजभवनाकडून देण्यात आली होती. मात्र राज्यपालांचे वय लक्षात घेता कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यपाल कोश्यारींना काही दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे आणि विश्रांतीची गरज आहे असे सांगण्यात आले होते. त्यामुळे, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या वेळी राज्यपालांची अनुपस्थिती हा पेच फारच मोठा होता. मात्र आता राज्यपाल राजभवनमध्ये परतले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *