महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२६ जून । गेले तीन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी पावसाचा जोर वाढल्याने शेतकरी वर्ग आनंदीत झाला असून भात लावणीच्या कामाने चांगलाच वेग घेतला असल्याचे चित्र पहायला मिळत आहे . संगमेश्वर तालुक्यासह राजापूर शहर आणि तालुक्यात मान्सूनचे जोरदार आगमन झाले आहे. सक्रीय झालेल्या मान्सूनने संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यात संततधार धरली आहे. त्यामुळे संगमेश्वर मधील शास्त्री – सोनवी आणि राजापूर मधील अर्जुना आणि कोदवली नद्या जोमाने प्रवाहीत झाल्या आहेत.
मान्सून सुरू झाल्यानंतर गेले काही दिवस सरीवर असलेल्या पावसाने शुक्रवार सायंकाळपासून तालुक्यात जोर धरला आहे. गेले तीन दिवस संततधार पडणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पेरणीनंतर पावसाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना शुक्रवार पासून चांगलाच दिलासा मिळाला आहे . पेरणीनंतर दररोज जेमतेम एखादीच सर पडल्याने रोपे जीवंत राहिली . अन्यथा रत्नागिरी जिल्ह्यात विशेष करुन माळावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले होते . जूनच्या सुरुवातीलाच पावसाने प्रतिक्षा करायला लावल्यानंतर शेतकरी चिंतेत पडले होते. अखेरीस बऱ्याच प्रतिक्षेनंतर पावसाचे दमदार आगमन झाले आहे . जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी भात लावणीच्या कामांना प्रारंभ केला आहे.