महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२६ जून । शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहाेचला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सेनेच्या बंडखाेर आमदारांबाबत मोठे विधान केले आहे. आज दिल्लीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले की, बंडखोर आमदारांचे गट हा आसाममध्ये गेला आहे. त्यांना सत्ता परिर्वतन हवे आहे. शिवसेनेची ही खात्री आहे की, गेलेले सर्व आमदार परत येतील. बंडखोर आमदार मुंबईत परत आल्यानंतर त्यांच्या भूमिकेत बद्दल होईल. या सत्तासंघर्षात अखेर उद्धव ठाकरे यांचाच विजय होईल .
या वेळी शरद पवार म्हणाले की, “मला माहिती असणारी शिवसैनिक वेगळी आहे. काही आमदारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेना संघटनेवर कोणताही परिणाम होणार नाही. कारण शिवसैनिक ही संघटनेची ताकद असून, राज्यात त्याचे जाळे पसरले आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांच्या भूमिकेचा शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी असो की, काँग्रेस आमचा शिवसेनेच्या नेतृत्वाला पाठिंबा आहे. एकनाथ शिंदे व त्यांच्याबरोबर गेलेल्यांनी नवीन गट स्थापन करण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारचा शिवसेनेच्या नेतृत्वाला पाठिंबा आहे. आज आमची आघाडी आहे आणि ती कायम ठेवण्याची इच्छा आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.