महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२६ जून । पंतप्रधान आवास योजनेंतर्गत खासगी जागांवर इमारत विकसित करून 50 टक्के घरे म्हाडाच्या दरानुसार विकण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण 3 हजार 747 घरे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे बाजारभावापेक्षा स्वस्त दरात घरे मिळणार आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या हद्दीत 176 हेक्टर जागेवर म्हाडाच्या 24 वसाहती आहेत. म्हाडाकडील एकूण 622 एकर जागेपैकी 498 जागेवर म्हाडाच्या वसाहती तसेच इमारती बांधण्यात आल्या आहेत. आता म्हाडा पुणे विभागाकडे स्वत:ची जागा उरलेली नाही.
या पार्श्वभूमीवर म्हाडाने खासगी जागेवर इमारत विकसित करून 50 टक्के घरे म्हाडाच्या दराने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत विकण्याचा प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्याला केंंद्राची मंजुरी मिळाली आहे. या योजनेला शहरासह जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून, म्हाडा पुणे विभागाकडे चार हजार घरांसाठी बांधकाम व्यावसायिकांचे 14 प्रस्ताव दाखलही झाले आहेत. विविध बांधकाम व्यावसायिकांचे चार हजार घरांसाठीचे 14 प्रस्तावही म्हाडाकडे दाखल झाले आहेत. या योजनेंतर्गत बांधकाम व्यावसायिकांना विविध करसवलती, एफएसआय मिळणार आहे.