महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२६ जून । शिवसेनेच्या बंडाळीने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने आता राजकीय नाही तर कायदेशीर लढाई सुरू केली आहे. शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना नोटिसा पाठविल्या आहेत. त्यांना सोमवारी ५ .३० वाजेपर्यंत बाजू मांडण्यास मुदत देण्यात आली आहे. तसेच विधासभा उपाध्यक्षांकडे कारवाईचे पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे बंडखोर एकनाथ शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
याबाबत पत्रकारांना माहिती देताना अॅड. देवदत्त कामत यांनी सांगितले की, जोपर्यंत शिंदे गट विलीन होत नाही, तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. शिंदे गटाकडे बहुमत असले, तरीही बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. सोमवारपासून बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यास सुरूवात होणार आहे. पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून आमदारांवर कारवाई करण्याचा पक्षाला अधिकार आहे. कारवाई होऊ द्यायाची नसेल, तर गट एखाद्या पक्षात विलिन करणे हाच एकमेव पर्याय आता शिंदे गटाकडे आहे.