महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२६ जून । पुण्यातील मार्केट यार्डातील घाऊक बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक वाढली आहे. बाजारात गेल्या काही दिवसांपासून आल्याची आवक कमी होत असून आल्याच्या दरात वाढ झाली आहे.राज्यातील मटारच्या दरात वाढ झाली आहे. आवक वाढल्याने बटाटा, टोमॅटोच्या दरात घट झाली असून अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
पुणे विभागातून सातारी आले ५०० ते ६०० गोणी, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, टोमॅटो दहा ते बारा हजार पेटी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, गाजर ५ ते ६ टेम्पो, गावरान कैरी ४ ते ५ टेम्पो, कांदा ७० ट्रक अशी आवक बाजारात झाली.
गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. कोथिंबर वगळता अन्य पालेभाज्यांचे दर तेजीत आहेत. मेथी, शेपू, कांदापात, चाकवत, करडई, अंबाडी, मुळा, राजगिरा, चवळई आणि पालकाच्या दरात वाढ झाली आहे. पुदीना आणि चुक्याचे दर स्थिर आहेत. रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात पावणेदोन लाख कोथिंबीर जुडी, मेथीच्या ४० हजार जुडींची आवक झाली. घाऊकबाजारात आवक वाढल्याने कोथिंबिरीच्या जुडीमागे २ रुपयांनी घट झाली आहे. किरकोळ बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीची दर २० ते २५ रुपये आहेत.
घाऊक फळबाजारात खरबूज, पपई, चिकूच्या दरात वाढ झाली. लिंबू, कलिंगड, पपई, अननस, पेरू, संत्री, मोसंबी, डाळिंबाचे दर स्थिर आहेत. फळबाजारात केरळहून ३ ट्रक अननस, डाळिंब ३५ ते ४० टन, मोसंबी २५ ते ३० टन, संत्री १ ते दीड टन, कलिंगड ३ ते ४ ट्रक, खरबूज २ ते ३ टेम्पो, लिंबे १५०० ते १६०० गोणी, पपई ७ ते ८ टेम्पो, पेरू १५० ते २०० क्रेट्स (प्लास्टिक जाळी) अशी आवक फळबाजारात झाली.