महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२८ जून । महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील दोन दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी इतका मोठा निर्णय घेऊ शकतात, ज्यावर राज्याच्या संपूर्ण राजकारणाचे फासे उलट फिरु शकतात.
शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकार विरोधात पुकारलेल्या बंडाचे काय परिणाम होतील, हे अजून भविष्यात कोणीही सांगू शकणार नाहीत. मात्र राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारसाठी पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी स्वतः राजकीय परिस्थितीत उडी घेऊ शकतात. ते फ्लोर टेस्ट ( अविश्वास ठराव मतदान) घेण्याचा निर्णय घेऊ शकतात. असे झाल्यास महाविकास आघाडी सरकार पडू शकते.
एकनाथ शिंदे मुंबईत येऊ शकतात
राज्यातील झपाट्याने बदलणारी परिस्थिती पाहता एकनाथ शिंदे आज किंवा उद्या मुंबईत येऊ शकतात, असे बोलले जात आहे. यासोबतच 39 आमदारांचा सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचे पत्र ते राज्यपालांना सुपूर्द करू शकतात. एकनाथ शिंदे यांच्या या पावलावर आत्तापर्यंत गप्प बसलेल्या भाजपची भूमिका स्पष्ट होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, भाजपनेही आपल्या आमदारांना मुंबईत येण्यास सांगितले आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.