![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२८ जून । कोरोना महामारीमुळे दोन वर्ष संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाताना इंदापूरला मुक्कामी न आल्याने शहर अध्यात्मिक पर्वणी असणाऱ्या पालखी सोहळ्यास मुकल्याने सोहळा परंपरेप्रमाणे इंदापुरातील श्री नारायणदास रामदास हायस्कूल प्रांगणात मुक्कामी असावा, अशी नगरसेवक भरत शहा व सहकाऱ्यांची मागणी पालखी सोहळा प्रमुखनितीन महाराज मोरे यांनी मान्य केल्याने भाविकांनी आनंद व्यक्त केला.
यंदा पालखी सोहळा मुक्कामाचे नियोजन आय. टी. आय मधील नूतन पालखी तळावर करण्याचे नियोजन होते. मात्र त्याविरुद्ध इंदापूरकरांनी एकत्र येत सिद्धेश्वर, इंद्रेश्वर मंदिरात बैठक घेत आवाज उठवला होता. यासंदर्भात प्रशासनाने पालखी सोहळा विश्वस्तांकडे बोट केल्याने तसेच पालखी सोहळा प्रमुखांना लेखी पत्र देवून सुध्दा त्याची दखल न घेतली गेल्याने इंदापूरकरांनी लोकशाही पद्धतीने आंदोलन केले. त्यानंतर यवत मुक्कामी सर्वांनी पालखी विश्वस्तांची भेट घेवून त्यांना विनंती केली. मात्र त्यांनी बारामती येथे निर्णय घेवू असे उत्तर दिले होते.
त्या पार्श्वभूमीवर आज दि. २८ जून रोजी भरत शहा व सहकाऱ्यांनी सिध्देश्वर मंदिरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी भरत शहा, बीएमपी चे राष्ट्रीय महासचिव ऍड. राहुल मखरे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे,समन्वयक बापू जामदार यांनी पालखी सोहळा विश्वस्तांनी इंदापूरकरांच्या भावनेचा आदर करावा, असे आवाहन केले.
यानंतर पत्रकारांनी नितीन महाराज मोरे यांना फोन वरून संपर्क साधला असता त्यांनी यंदा सोहळ्याचा मुक्काम पूर्वीप्रमाणे शाळेत करू मात्र पुढील वर्षापासून शासनाने दिलेल्या जागेत मुक्काम करणार असल्याचे त्यांनी सूचित केले.