![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२८ जून । विठ्ठल नामाच्या जयघोषात आज मंगळवारी (ता.२८) रोजी नीरा (ता.पुरंदर) येथे ज्ञानेश्वर महाराजांच्या रथसोहळ्याचे आगमन झाले. गेली दोन वर्षे कोरोना संकटकाळात बंद असलेला पालखी सोहळा गावात आल्यावर नीरेकरांनी फुलांची उधळण करत माऊली माउलींच्या जयघोषात पालखी सोहळ्याचे स्वागत केले. आज दुपारचा विसावा आटोपून संत ज्ञानेश्र्वर महाराज यांचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्याकडे मार्गस्थ झाला. यावेळी लाडक्या माऊलींना निरोप देताना नीरेकरांचे डोळे पाणावले.
सकाळी अकरा वाजता लाखो वारकऱ्यांसह संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा नीरेत दाखल झाला. भगव्या पताका, फुलांनी सजविलेल्या रथात विराजमान माउलींच्या पादुका, पुढे मागे सेवेकरी अशा थाटामाटातील शाही सोहळ्याचे स्वागत येथील शिवाजी चौकात नीरा ग्रामपंचायतीसमोर करण्यात आले. यावेळी सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, नीरा येथील नागरिकांमध्ये सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते. नागरिक व सेवाभावी संस्थांच्या वतीने वारकऱ्यांना अन्नदान करण्यात आले. काही संस्थांनी वारकऱ्यांसाठी फळे, मिठाईचे वाटप केले. विसाव्यादरम्यान ऊन सावलीचा पाठशिवणीचा खेळ चालू असल्याने वातावरण आल्हाददायक झाले होते.