महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३० जून । उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने विधानसभेतील शक्तिप्रदर्शन टळले असले तरी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असणारे आमदार अद्याप राज्यात आलेले नाहीत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत चाचणीचे निर्देश दिल्यानंतर गोव्यामध्ये रात्री उशिरा हे बंडखोर आमदार दाखल झाले असले तरी त्यांनी महाराष्ट्रात येण्याची घाई करु नये असा सल्ला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील बातमी दिलीय. हा सल्ला देण्यामागील मुख्य कारण म्हणजे भाजपाने अद्याप पुढील नियोजन केलेलं नसून बंडखोर आमदारांनी थेट शपथविधीच्या दिवशी मुंबईत यावं अशी भाजपाची इच्छा आहे.
Those (rebel Shiv Sena MLAs) who were reaching Mumbai tomorrow, I urge them not to come tomorrow, they should come on the day of oath-taking: Maharashtra BJP chief Chandrakant Patil pic.twitter.com/pXDDAQ35pM
— ANI (@ANI) June 29, 2022
उद्धव ठाकरेंनी रात्री दहाच्या सुमारास मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बहुमत चाचणीसाठी मुंबईतील ताज प्रेसिडेन्स हॉटेलमध्ये जमलेल्या भाजपा आमदारांनी जल्लोष केला. यावेळी चंद्रकांत पाटलांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पेढा भरवून आनंद साजरा केला. या जल्लोषानंतर हॉटेलबाहेर पडलेल्या चंद्रकांत पाटलांनी माध्यमांशी बोलताना शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी उद्या (३० जून रोजी) मुंबईत येऊ नये असं आवाहन केलं आहे.