पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा ; हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१ जुलै । गुरुवारी मुंबईत पावसानेही दमदार एन्ट्री घेतली. यंदाच्या हंगामात मुंबईत पहिल्यांदाच मुसळधार म्हणावा, असा पाऊस (Rain) कोसळला. त्यामुळे नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे पाणी साचणे, लोकल ट्रेनचा खोळंबा, रस्त्यांना तलावाचे स्वरुप येणे, असे नित्याचे दृश्य पाहायला मिळाले. हवामान खात्याच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये मुंबईत तब्बल १६३ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.

आज सकाळपासूनही मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने मुंबई आणि कोकणाला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत या दोन्ही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. मुंबईत गुरुवारी सकाळी सुरु झालेल्या पावसाने तुरळक अपवाद वगळता जराही विश्रांती घेतलेली नाही.

आज सकाळपासूनही मुंबईत पाऊस लागून राहिलेला आहे. त्यामुळे दादर, अंधेरी आणि कुर्ला या भागांमध्ये पाणी साचले आहे. दादरच्या हिंदमाता परिसरालाही नेहमीप्रमाणे तलावाचे स्वरुप आले आहे. या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहनचालक आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तर दुसरीकडे पावसाचा सध्याचा रागरंग पाहता लोकल ट्रेन्सचाही खोळंबा होण्याची शक्यता आहे. जोरदार पावसामुळे कालपासूनच लोकल ट्रेन्स १० ते १५ मिनिटे उशीराने धावत आहेत. पावसाचा सध्याचा जोर पाहता आजही मुंबईतील रेल्वेचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या चार ते पाच दिवसांत राज्यातील सर्व भागांमध्ये मान्सून सक्रिय होणार आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीला सुरुवात करता येईल. काल दिवसभरात रत्नागिरी येथे ८३, अलिबाग येथे ५२, डहाणू येथे २१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोकण विभाग सोडून उर्वरित महाराष्ट्रामध्ये दिवसभरात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. कोल्हापूर, महाबळेश्वर आणि सांगली येथे अनुक्रमे ९, ८ आणि ५ मिलिमीटर पाऊस झाला. विदर्भात अमरावती येथे १६ आणि यवतमाळ येथे १४ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. बुलडाणा येथे ६, तर नागपूर येथे ४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *