महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३ जुलै । महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी घडवून सत्तांतर झाले. त्यानंतर नवीन सरकारला बहुमत सादर करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहेत. मात्र त्यापूर्वीच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली जात असून त्यात नेमका व्हीप कुणाचा पाळायचा, याबाबत महत्त्वपूर्ण भूमिका विधानसभा उपाध्यक्ष बजावू शकतात.
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हेच अध्यक्ष निवडीबाबत कामकाज पाहतील. त्यांचे पद अद्याप गेलेले नाही. त्याबाबत ठराव पास होत नाही, तोपर्यंत तेच कामकाज पाहतील, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
शरद पवार म्हणाले, सदस्यांना पक्षाचा व्हीप पाळावा लागतो. पक्ष म्हणजे विधिमंडळ पक्ष आणि पक्ष संघटना, असे ते म्हणाले. व्हीप मान्यतेबाबत सभागृह अध्यक्ष निर्णय घेतील. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी भाजपकडून युवा आमदार राहुल नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केली आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपला अर्ज दाखल केला आहे. या निवडीसाठी शिवसेनेने व्हीप जारी केला आहे. परंतु, एकनाथ शिंदे यांनी आम्ही व्हीप पाळणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे.
देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी राजभवनावर राज्यापालांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला. या वेळी राज्यपालांनी शिंदे व फडणवीस यांना पेढा भरवला व पुष्पगुच्छ दिले. नेमके यावरूनच शरद पवारांनी राज्यापाल भगतसिंह कोश्यारींवर निशाणा साधला. ते म्हणाले, मी पण वेगवेगळ्या शपथा घेतल्या. पण, कोणत्याही राज्यपालांनी मला पेढा भरवला नाही. कधीही फुलांचा गुच्छ दिला नाही, असा टोमणा पवारांनी राज्यपालांना लगावला. तसेच आमदारांचा सुरत -गुवाहाटी-गोवा प्रवास सुखकर होण्यासाठी ‘बरीच काळजी’ घेतल्याचे सांगितले जाते, असेही ते म्हणाले.