महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३ जुलै । विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक थोड्याच वेळात पार पडणार आहे. शिवसेनेनं आपल्या सर्व आमदारांना व्हीप बजावला आहे. तर दुसरीकडे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटानेही व्हीप बजावला आहे. शिवसेनेच्या लेटर पॅडवर हा व्हीप बजावला असून यामध्ये राहुल नार्वेकर यांना विजयी करा असा आदेश काढला आहे.
शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे भाजपच्या मदतीने मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहे. आता पहिल्यांदाच शिवसेनेचे आमदार आणि एकनाथ शिंदे हे विधानभवनात आमनेसामने येणार आहे. राज्यपालांनी बोलावलेल्या विशेष अधिवेशनात आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेनं आधीच व्हीप बजावला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटानेही व्हीप बजावला आहे.
या व्हीपमध्ये भाजपचे नेते राहुल नार्वेकर हे शिवसेना आणि भाजपचे अधिकृत उमेदवार असणार आहे. तसंच 2 तारखेला ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये बैठक झाली, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजूनही पक्षादेश पत्रावर गटनेते म्हणून नमुद आहे. तर आमदारांनी प्रतोद म्हणून नियुक्त केले होते भरत गोगावले यांचेही पक्षादेशावर नाव आहे. या पत्राद्वारे एकनाथ शिंदे गटाने पुन्हा एकदा शिवसेना पक्ष त्यांचाच असल्याचा दावा केला आहे. ते अजूनही शिवसेनेतच आहेत हे पुन्हा एकदा पक्षादेश जारी करुन जाहीर केले.