महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ जुलै । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर रविवारी मनसोक्त शाब्दिक टोलेबाजी केली. ‘मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे घेतील असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्यावर भाजपचे कितीतरी नेते ढसाढसा रडायला लागले. भाजपच्या १०५ आमदारांनी सद्सद््विवेक बुद्धीला स्मरून सांगावे की जे घडले आहे त्याने समाधान झाले का? असा सवाल अजित पवारांनी केला. विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनपर भाषणात ते बोलत होते. अजित पवारांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चांगलेच चिमटे काढले. चंद्रकांत पाटलांना चिमटा काढताना म्हणाले, दादा, तुम्हाला मंत्रिपद मिळेल की नाही सांगता येत नाही, कुठं बाकडं वाजवताय?अजित पवार म्हणाले, ‘अनेक कट्टर काम करणारे मान्यवर थोडेसे नाराज आहेत. देवेंद्र फडणवीस टीव्हीवर बोलत होते आणि त्यांनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे घेतील सांगितले तेव्हा ‘पिन ड्रॉप सायलेन्स’ झाला. कितीतरी भाजपचे नेते तर ढसाढसा रडायलाच लागले. कुणाला काही कळेनाच. सगळ्या महाराष्ट्रासाठीच तो धक्का होता.’ ‘गिरीश महाजन यांचे तर अजूनही रडणे बंद नाही. त्यांना फेटा बांधायला दिला तर ते डाेक्याचा फेटा सोडून डोळ्याला आलेले पाणी पुसण्यासाठी फेट्याचा वापर करत आहेत. त्यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री न झाल्याचे फारच वाईट वाटले,’ असे म्हणत अजित पवार यांनी गिरीश महाजन यांना कोपरखळी लगावली.
पवार म्हणाले, ‘मी जेव्हा सभागृहात समोरच्या बाजूला पाहतो तेव्हा मूळचे भाजपचे मान्यवर कमी आणि आमच्याकडून गेलेलेच जास्त मान्यवर पाहायला मिळतात. आमच्या मान्यवरांना पदावर बसलेले पाहून मला मूळ भाजपच्या मान्यवरांविषयी वाईट वाटते. गणेश नाईक, बबन पाचपुते, राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत हे आमच्याकडून गेलेले मान्यवर पहिल्या ओळीत आहेत.