महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जुलै । किरकोळ बाजारात खाद्यान्न वस्तूंच्या किंमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांचे परिणाम दिसू लागले आहेत. आठवडाभरात खाद्य तेल, डाळी आणि टोमॅटोच्या किंमती घट झाल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकारने खाद्य वस्तूंच्या किंमतींची ताजी आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार आठवडाभरात खाद्य तेल, टोमॅटो आणि डाळींच्या किंमतीत घसरण झाल्याचा दावा केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने केला आहे.
अन्न आणि नागरी मंत्रालयाने ७ जुलै २०२२ रोजी जारी केलेल्या तपशिलानुसार मोहरी आणि पाम तेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे. ७ जून २०२२ रोजी मोहरीच्या तेलाचा सरासरी भाव १८२.४० रुपये होता. ७ जुलै रोजी तो १७८.०१ रुपये इतका खाली आला आहे. त्याशिवाय सोयाबीन तेलाच्या भावात २.२९ टक्के घसरण झाली. वनस्पतीचा भाव १.९३ टक्के आणि सूर्यफूल तेलाचा भाव ३.९३ टक्क्यांनी कमी झाला आहे. पाम तेलाच्या किरकोळ विक्रीत सरासरी ७.८४ टक्के घसरण झाली आहे.
गेल्या दोन आठवड्यात जागतिक बाजारपेठेत खाद्य तेल आणि तेल बियांच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. मलेशियात पाम तेलाचा भाव ३५० ते ४०० डॉलरने कमी झाला आहे. परिणामी तेल उत्पादकांसाठी पाम तेल आयात स्वस्त झाली. त्यांनी खाद्य तेलाच्या किरकोळ दरात १० ते १५ रुपयांची कपात केली. बुधवारी केंद्र सरकारने तेल उत्पादकांसोबत बैठक घेतली होती. त्यात आणखी दर कपात करण्याचे निर्देश सरकारने कंपन्यांना दिले होते. त्यामुळे नजीकच्या काळात तेलाचा भाव २५ ते ३० रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे.
याशिवाय टोमॅटोचा भाव १४.७३ टक्क्यांनी कमी झाला आहे. गेल्या महिन्यात टोमॅटोने १०० रुपयांचा आकडा पार केला होता. टोमॅटो स्वस्त झाले असले तरी कांदे आणि बटाटे यांच्या किंमतीत सरासरी ८ टक्क्यांची वाढ झाली. विविध प्रकारच्या डाळींच्या किंमतीत देखील महिनाभरात घसरण झाल्याचे सरकारने म्हटलं आहे.