महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जुलै । शिवसेनेत झालेलं बंड मोडून काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आघाडीवर येऊन बंडखोरांना आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आज मातोश्रीवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. यावेळी वारकऱ्यांनी मला पंढरपूरला येण्याची विनंती केली आहे. विठू माऊली माझ्याही मनात आहे. मात्र या गदारोळात मी पंढरपूरला जाणार नाही. पण मी वारकऱ्यांनी केलेल्या विनंतीनुसार हा गदारोळ आटोपल्यानंतर मी पंढरपूरला विठुमाऊलीच्या दर्शनाला जाणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्हा सर्वांना सन्मानानं मातोश्रीवर बोलावलं आणि निमंत्रण मिळताच तुम्ही आलात. भविष्यातही बोलावल्यावर प्रेमानं याल, अशी अपेक्षा करतो. पुढच्या दोन तीन दिवसांवर आषाढी एकादशी आली आहे. लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात आहेत. मलाही पंढरपूरला विठूमाऊलीच्या दर्शनासाठी येण्यासाठी वारकऱ्यांचे निरोप आले आहेत. विठू माऊली माझ्याही हृदयामध्ये आहे. मात्र मी या सर्व गदारोळात दर्शनाला येणार नाही. मी नंतर पंढरपूरला येऊन विठू माऊलीचं दर्शन घेईन.