महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जुलै । मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया यांसारखे अनेक घातक आजार डासांमुळे होतात. लोक डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी विविध उपाय करतात. यासाठी लोकं मॉस्किटो रिपेलेंट कॉइल, अगरबत्ती किंवा इलेक्ट्रिक रिफिल मशीन वापरतात. यामुळे डासांपासून काही काळ सुटका मिळते, पण त्याचे दुष्परिणामही होतात. एका अभ्यासात असं आढळून आलंय की, डासांपासून बचाव करणाऱ्या अगरबत्तीचा धूर आपल्या फुफ्फुसांना हानी पोहोचवू शकतो. तसंच यामुळे कॅन्सर होऊ शकतो. मॉस्किटो रिपेलेंट कॉइलच्या दुष्परिणामांबद्दल आज जाणून घेऊ या.
चेस्ट रिसर्च फाऊंडेशनने केलेल्या अभ्यासात असं आढळून आलंय की, डासांपासून बचाव करणाऱ्या कॉइलमध्ये कॅन्सर निर्माण करणारे अनेक गुणधर्म आहेत. त्याचवेळी चीन आणि तैवानमध्ये केलेल्या अभ्यासातून असंही समोर आलंय की, मॉस्किटो कॉइलच्या धुराचा थेट संबंध कर्करोगासारख्या घातक आजाराशी आहे.
नो स्मोकिंग कॉईल
आजकाल नो स्मोकिंग कॉईल बाजारात उपलब्ध आहेत. या कॉइलमध्ये धूर नसतो, परंतु त्यातून जो पदार्थ बाहेर पडतो तो शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतो. वास्तविक, धूर नसलेल्या कॉइलमधून भरपूर कार्बन मोनोऑक्साइड सोडला जातो. त्यामुळे फुफ्फुसाचं मोठं नुकसान होतं.