महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – किसान विकास पत्र ही मोदी सरकारची योजना या छोट्या बचतीं पैकी एक आहे. मोदी सरकारने जूनच्या तिमाहीमध्ये किसान विकास पत्रमध्ये मिळणारा व्याजदर घटवून तो 6.9 टक्क्यांवर आणला आहे. छोट्या बचतीसाठी किसान विकास पत्र सामान्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे. तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही ही योजना घेऊ शकता.
किसान विकास पत्र योजनेमध्ये दुप्पट होणार पैसा ? काही दिवसांपूर्वीच वित्त मंत्रालयाने किसान विकास पत्रमध्ये मिळणाऱ्या व्याजदरामध्ये कपात केल्याची घोषणा केली आहे. सरकार प्रत्येक तीन महिन्यासाठी व्याजदर निश्चित करते. 6.9 व्याजदराच्या आधारावर या योजनेअंतर्गत 9 वर्ष 2 महिन्यांमध्ये तुमचे पैसे दुप्पट होतील. म्हणजेच 110 महिन्यात पैसे दुप्पट होतील. याआधी 9 वर्ष 5 महिने अर्थात 113 महिन्यात पैसे दुप्पट होत असत.
काय आहे किसान विकास पत्र ? हे एकप्रकारचे प्रमाणपत्र असतं, जे तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून खरेदी करू शकता. बाँडप्रमाणेच प्रमाणपत्राच्या रुपात ते जारी करण्यात येतं. सरकारकडून एका निश्चित स्वरूपात व्याज या योजनेअंतर्गत मिळते. तुम्ही याची खरेदी अल्पवयीन मुलासाठी देखील करू शकता. 2 जणांच्या नावावर देखील याची खरेदी करता येईल. यासाठी 2 पासपोर्ट साइझ फोटो, ओळखपत्र (रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट इ.) निवास प्रमाणपक्ष (वीजबिल, टेलिफोन बिल, बँक पासबूक इ.) या कागदपत्रांची गरज लागेल. जर गुंतवणूक 50 हजारांपेक्षा जास्त असेल तर पॅन कार्ड देखील आवश्यक आहे.
या योजनेत किती गुंतवणूक करू शकाल ?किसान विकास पत्रमध्ये तुम्ही कमीत कमी 1000 आणि जास्तीत जास्त कितीही गुंतवणूक करू शकता. पैसे काढण्यासाठी तुम्हाला 110 महिन्यांची वाट पाहावी लागेल. फायनान्शिअल एक्सपर्ट यामध्ये दीर्घ काळासाठी गुंतवणूक करण्याचे सुचवतात.