पुणेकरांसाठी पुढील 8 दिवस महत्त्वाचे ; त्यासाठी 8 दिवस कठोर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही – अजित पवार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – पुणे – पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी अजित पवार यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना व करावयाच्या कार्यवाहीबाबत माहिती जाणून घेतली. पुण्यात वाढत जाणारे कोरोनाबाधित रुग्ण व मृत्यू दर पाहाता पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिसरात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, तसेच कुठल्याही परिस्थितीत रुग्णांची संख्या वाढता कामा नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

अजित पवार म्हणाले, पुण्यात वाढणारे कोरोनाबाधित रुग्ण ही चिंतेची बाब आहे. कुठल्याही परिस्थितीत त्यास प्रतिबंधीत करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाकडून जी काही मदत लागेल ती आम्ही देण्यास तयार आहोत. पोलीस प्रशासनाने पाहिजे तर कठोर धोरण अवलंबवावे. त्यासाठी 8 दिवस कठोर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. यासाठी नागरिक निश्चितच सहकार्य करतील.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यासाठी आरोग्यसेवा अत्यंत तत्पर आणि सक्षम करण्यात येईल, असे स्पष्ट केले. ते म्हणाले, ससून रुग्णालयाच्या नवीन 11 मजली इमारतीची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत, त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. जिल्हा नियोजन समितीमधून 25 टक्के निधी खर्च करण्याचे अधिकार शासनाने यापूर्वीच दिले आहेत.

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कन्टेंन्टमेंट झोन परिसरात कडक निर्बंध घालण्यात यावेत. या भागातील नागरिकांना वारंवार ये- जा करता येणार नाही. त्याचबरोबर या भागातील सार्वजनिक स्वच्छतागृहे व अन्य परिसरात स्वच्छेतेची विशेष दक्षता बाळगावी. येथील नागरिकांना फ्ल्यू सदृश लक्षणे आढळल्यास त्यांनी तात्काळ तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. तसेच रॅपीड टेस्टमार्फत देखील संभाव्य रुग्ण शोधण्यावर भर द्यावा. हॉटस्पॉट असणाऱ्या ग्रामीण भागात देखील कडक निर्बंध अवलंबवावे लागणार आहेत. अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *