पुणेकरांची पाणी कपात टळणार ? पाणीसाठ्यात ४.४४ टीएमसीने वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जुलै । खडकवासला प्रकल्पांतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मागील आठवड्यापासून सातत्याने संततधार पाऊस सुरु असल्याने एकाच आठवड्यात पाणीसाठ्यात ४.४४ टीएमसीने वाढ झाली आहे. यामुळे खडकवासला प्रकल्पातील एकूण पाणीसाठा ६.९५ टीएमसी झाला आहे. गेल्या आठच दिवसांत पुण्याला चार महिने पुरेल इतका पाणीसाठा वाढला आहे. शिवाय सध्याचा एकूण साठा हा शहराला किमान सहा महिने पुरू शकणार आहे. यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता आता मिटली आहे.

पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांतील मिळून एकूण पाणीसाठा हा २ जुलै २०२२ ला २.५१ टीएमसी इतका झाला. त्यातच जून महिन्यात पाऊस न पडल्याने पाणीटंचाईचे संकट घोंघावू लागले होते. यामुळे पालिकेने पुण्यात पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु २ जुलैपासून या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु झाला आणि आजही तो चालू आहे. यामुळे या प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असल्याचे जलसंपदा विभागातर्फे शनिवारी (ता.९) सायंकाळी प्रसिद्ध करण्यात पाणीसाठा आकडेवारी अहवालातून स्पष्ट झाले आहे.

खडकवासला प्रकल्पात खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर ही चार धरणे येतात. या चार धरणांची मिळून एकूण २९.१५ टीएमसी इतकी पाणी साठवण क्षमता आहे. यापैकी शनिवारी (ता. ९) सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६.९५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत यंदाच्या पावसाळ्यातील सर्वाधिक पाऊस झाला आहे. यामुळे धरणांची पाणी पातळी वेगाने वाढू लागली आहे.

गेल्या २४ तासांपासून चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस पडत आहे. या २४ तासांत खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३० मिलिमिटर, पानशेत पाणलोट क्षेत्रात १६५ मिलिमिटर, वरसगाव पाणलोट क्षेत्रात १५७ आणि टेमघर पाणलोट क्षेत्रात १९० मिलिमिटर इतका विक्रमी पाऊस झाला आहे.

पुणे शहराला दरमहा १.२५ (सव्वा) टीएमसी पाण्याची गरज लागते. पुणेकरांची पाण्याची ही गरज खडकवासला प्रकल्पातील चार धरणांतील पाण्यामुळे पूर्ण होत असते. त्यामुळे पुणे शहरातील पाण्याची गरज किंवा कपात ही या चार धरणांतील उपलब्ध पाणीसाठ्यावर अवलंबून असते. शनिवारी (ता. ९) सायंकाळी पाच वाजेपर्यंत या धरणांतील एकूण पाणीसाठा हा ६.९५ टीएमसी इतका झाला आहे. गेल्या २४ तासांत तब्बल १.२४ टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. शिवाय उद्या (रविवारी) सकाळपर्यंत यात आणखी सुमारे एक टीएमसीची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्याला किमान सहा महिने हा पाणीसाठा पुरू शकणार असल्याचे जलसंपदा विभागातून सांगण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *