महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जुलै । राज्यात एखादी समस्या, दुर्घटना किंवा अपघात घडला की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लगेच मोबाईल कॉल किंवा व्हिडीओ कॉल करतात. नंतर काही क्षणातच तो संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो. यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना मिश्कील टोला हाणला. शिंदे नवा पायंडा पाडत आहेत. एक क्षणही वाया घालवत नाहीत, असे पवार म्हणाले.
शरद पवार दोन दिवसांच्या संभाजीनगर दौऱयावर आले असून आज त्यांनी पत्रकारांशी राज्यातील सद्य राजकीय स्थिती, बंडखोर आमदार, नामांतराचा मुद्दा आदी विषयांवर संवाद साधला. मुख्यमंत्र्यांचे तत्पर व्हिडीओ आणि फोन कॉल्सबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले, चांगले आहे. मुख्यमंत्री तातडीने लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी फोन किंवा व्हिडीओ कॉल करतात. ते राज्यात नवा पायंडा पाडत आहेत. ते एक क्षणही वाया जाऊ देत नाहीत. हा फोन किंवा व्हिडीओ कॉल क्षणाचाही विलंब न लावता सोशल मीडियावर पोहोचला पाहिजे यासाठी त्यांची सर्व यंत्रणा तयार आहे, असे पवार मिश्कीलपणे म्हणाले.