राज्यातील सत्तांतरानंतर हे दोन नेते येणार शुक्रवारी एकाच मंचावर; राजकीय वर्तुळाचे लागले लक्ष

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ जुलै । राज्यातील सत्तांतरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येत्या शुक्रवारी पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येत आहेत. दरम्यान, त्याच दिवशी ते परत जाण्याची शक्यता असल्याने शनिवारी होणारा पक्षाचा मेळावा रद्द झाल्याचे समजते.

कृषी विकास प्रतिष्ठानचा डॉ. सी.डी. मायी कृषी तज्ज्ञ पुरस्कार माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ पत्रकार व कृषी अभ्यासक डॉ. सुधीर भोंगळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सोहळा होईल. एक लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रमास माजी मंत्रिद्वय डॉ. नितीन राऊत व सुनील केदार, श्री शिवाजी शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख प्रमुख पाहुणे राहतील, अशी माहिती कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी व कार्याध्यक्ष श्रीराम काळे यांनी दिली.

राज्यसभा निवडणुकीपासून राज्यातील राजकीय घडामोडी प्रचंड वेगाने घडल्या. राजकीय उलथापालथ झाली. महाविकास आघाडीचे सरकार पडले आणि शिंदे-फडणवीस यांचे सरकार आले. प्रतिष्ठानने हा कार्यक्रम बराच आधी ठरवला. त्यानुसार, पवार यांनी नागपुरात दोन दिवस दिले होते. पक्षाध्यक्ष येत असल्याने शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन जय्यत तयारी केली. तसेच, शनिवारी पक्षाचा मेळावाही आयोजित केला होता. मात्र, पवार यांच्या दौऱ्यात बदल झाला. कृषी प्रतिष्ठानच्या कार्यक्रमानंतर ते लगेच परत जाण्याची शक्यता आहे. नागपुरात मुक्काम केला तरी, दुसऱ्या दिवशी मेळावा होणार नसल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *