महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जुलै । एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक शिवसेना आणि अपक्ष आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपने राज्यात सरकार स्थापन केलं. सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेतील आमदार, खासदार अजूनही शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. अशातच काही वेळापूर्वी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP leader Jitendra Awhad) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या भेटीला पोहोचले होते.
स्वतः जितेंद्र आव्हाड यांनीच आपल्या या भेटीमागचं कारण सांगितलं आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून माझी आणि त्यांची भेट झाली नव्हती. माझ्या भागातील विकासकामांसाठी मी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. मात्र, मुख्यमंत्री यांचा पुरेसा वेळ मला मिळाला नाही. भेटीसाठी मी पुन्हा त्यांची वेळ मागितली आहे, असंही आव्हाड म्हणाले..
जितेंद्र आव्हाड म्हणाले, की ठाण्यातील बायपास खराब झाला आहे. त्यावर उपाययोजना करावी अशी मागणी मी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ही माझी पहिली सदिच्छा भेट होती, असंही त्यांनी सांगितलं. महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर राष्ट्रवादीकडून पहिल्यांदाच आव्हाड हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले होते.