सततच्या पावसाने भाजीपाल्याचे दर कडाडले ; पालेभाज्या झाल्या दुर्मिळ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ जुलै । गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेला पावसामुळे शेतमालाची आवक प्रभावित झाली असून, सामान्य परिस्थितीच्या तुलनेत अवघी ५० ते ६० टक्के आवक सध्या सुरू असल्याने सध्या भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत.

आवक घटण्यासह पावसामुळे विक्रेत्यांकडील भाजीपालाही खराब होत असल्याने भाज्यांचे दर वधारले असून, पालेभाज्या लवकर खराब होत मिळेनाशा झाल्या आहेत. ज्या थोड्याफार पालेभाज्या उपलब्ध होत आहेत त्यांचे दरही जास्त असल्याचे चित्र आहे. शेतकरी बांधवांकडील भाजीपाला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल होत असतो. तेथून विक्रेत्यांकडून भाजीपाला खरेदी करत किरकोळ बाजारात विक्री केली जाते. सध्याच्या परिस्थितीत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शहरी भागालगतच्या मखमलाबाद, म्हसरूळ, आडगाव यासह पेठ, सुरगाणा, सिन्नर, निफाड इतर भागांतून भाजीपाला दाखल होतो. नाशिक शहरासह मुंबई व गुजरातमध्ये येथून भाजीपाला पाठविला जातो.

गेल्या तीन-चार दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांना बाजार समितीत येणे अशक्य झाले आहे. पावसामुळे भाजीपाला सडल्यानेदेखील आवक घटली आहे. नियमित आवकेच्या सुमारे ५० ते ६० टक्केच आवक सध्या होत आहे. मंगळवारी पावसाने उघडीप दिल्याने काही प्रमाणात आवक सुरू होती. परंतु, आवक पूर्वपदावर येऊ शकली नाही. किरकोळ विक्रेत्यांकडे फळभाज्या शंभरीकडे टेकल्या असतानाच मेथीची जुडी ३० ते ४० रुपये, शेपू २५ ते ३५०रुपये, पालक २० ते ३० रुपये जुडीप्रमाणे विक्री होताना दिसले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *