महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ जुलै । शिवसेनेतून बंडखोर शिंदे गटात सामील होणाऱ्या नेत्यांच्या हकालपट्टीचं सत्र कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे पुरंदर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार विजय शिवतारे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसंच शिवतारे यांचं पक्ष सदस्यत्वही रद्द करण्यात आलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड पुकारत शिवसेनेच्या ४० आमदारांची मोट बांधली आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडलं. त्यानंतर शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्याच्या जोरावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आमदारांसह संघटनेतील इतर नेत्यांकडूनही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवत मुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं जात आहे. माजी राज्यमंत्री आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पुरंदर मतदारसंघात पराभूत झालेल्या विजय शिवतारे यांनीही एकनाथ शिंदे यांची भेट त्यांना पाठिंबा दिला होता.
विजय शिवतारे यांनी गुरूपौर्णिमेला उद्धव ठाकरे यांची भेट न घेता भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणं पसंत केलं होतं. या भेटीचा फोटोही शिवतारे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केला होता. यातून त्यांनी शिवसेना नेतृत्वाला थेट आव्हान दिल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवरच अखेर आता शिवसेनेकडून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबत शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे.