‘नायर’ आता ‘करोना’ रुग्णालय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ! आकाश शेळके ! – सध्या या रुग्णालायमध्ये विविध आजारांवर वैद्यकीय उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी नजिकच्या एच इमारतीमध्ये २५० खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. करोनाचा संसर्ग वाढता असताना मृत्युदर कमी करण्याचे सर्वात मोठे आव्हान आता आरोग्य यंत्रणेपुढे आहे. कस्तुरबा रुग्णालयाची क्षमता संपत आल्याने आणि सेव्हन हिल रुग्णालयावरील भार वाढत असल्याने नायर रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे रूपांतर करोना रुग्णालयात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

सध्या या रुग्णालायमध्ये विविध आजारांवर वैद्यकीय उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी नजिकच्या एच इमारतीमध्ये २५० खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. करोना रुग्णालयामध्ये व्हेन्टिलेंटरची सुविधा, ऑक्सिजनची उपलब्धता, तसेच काही ठिकाणी वैद्यकीय सामग्रीची जोडणी, पडद्यांची सोय करण्यात येणार आहे. या रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या व करोना नसलेल्या ठिकाणी काम करणारे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी तसेच परिचारिकांची टीम वेगळी असेल त्यामुळे संसर्ग नियंत्रणात राहण्यास मदत होईल, असा विश्वास पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी व्यक्त केला.

सलग ड्युटी करून ब्रेक घ्यावा की काही दिवसांच्या ड्युटीनंतर सुटी घ्यावी यासंदर्भातील नियोजन कसे असावे याची विचारणा रुग्णालय प्रशासनाकडे करण्यात आली आहे. येथे काम करणाऱ्या स्टाफची राहण्याची सुविधाही करण्यात येणार आहे. पीपीई तसेच मास्कची पुरेशी उपलब्धता देण्यात येणार आहे. या रुग्णालयाची जबाबदारी लो. टिळक रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांच्याकडे देण्यात आली आहे, तर टिळक रुग्णालयामध्ये डॉ. जोशींच्या ऐवजी डॉ. इंगळे काम पाहणार आहेत. डॉ. रमेश भारमल हे पालिका रुग्णालयाचे संचालक म्हणून काम पाहणार आहेत. सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये डॉ. जोशी हे व्हिजिटिंग डॉक्टर म्हणून जातील.

नायर रुग्णालय हे केवळ रुग्णालय नसून ते वैद्यकीय महाविद्यालय असल्यामुळे येथे नव्याने होणाऱ्या प्रवेशांवरही परिणाम होईल. जून महिन्यामध्ये परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचाही प्रश्न उद्भवणार आहे, तसेच रुग्णालयमध्ये सध्या पुरेशी व्यवस्था नाही त्यामुळे एका आठवड्यामध्ये करोना रुग्णालय उभे राहणार नाही. त्यासाठी किमान वीस दिवसांचा कालावधी लागेल. हा निर्णय घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांचा विचार व्हायला हवा होता, असा सूर विद्यार्थी डॉक्टरांमधून उपस्थित केला जात आहे. केईएम रुग्णालयाचे रूपांतर करोना कक्षामध्ये करण्यात येणार होते. मात्र, तेथे सर्वसामान्य आजारांसाठी अनेक रुग्ण वैद्यकीय उपचार घेतात त्यामुळे हा निर्णय बदलण्यात आल्याचे कळते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *