शिंदे-फडणवीसांचा धक्का कोणाला ? राष्ट्रपतिपद मतदान गुप्त, उत्कंठा वाढली

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ जुलै । राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना आमदारांची दोनशे मते मिळवून देऊ असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला असताना आणि त्यांच्या जोडीला राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीत चमत्कार करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याने उद्याच्या निवडणुकीत विरोधकांची मते फुटतील का या बाबत कमालीची उत्सुकता आहे.

राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड आणि शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला तेव्हाही १६४ मते मिळाली होती. लक्ष्मण जगताप व मुक्ता टिळक हे भाजपचे दोन आमदार मतदानाला येऊ शकले नव्हते. नार्वेकर यांना आता त्यांना मताधिकार असेल. याचा अर्थ भाजप-शिंदे गटाकडे आता १६७ संख्याबळ आहे. जगताप, टिळक मतदानाला येण्याची शक्यता नाही. याचा अर्थ १६५ चे संख्याबळ असेल. २०० चा आकडा गाठायचा तर ३५ मते लागतील. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे हा आकडा १८० इतका होईल. २०० चा जादुई आकडा गाठण्यासाठी आणखी २० आमदारांची मते लागणार आहेत.

काँग्रेस व राष्ट्रवादीच्या काही आमदारांची मते खेचून आणण्याची भाजप-शिंदे यांची रणनीती असू शकते. विधान परिषदेत काँग्रेसच्या सात आमदारांची मते फुटली होती. या सात आमदारांवर कारवाईची टांगती तलवार असताना उद्या काय होणार हा प्रश्न आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही गुप्त मतदान आहे. त्याचा फायदा घेऊन विरोधकांची मते फोडण्यावर सत्तापक्षाचा भर असेल. विधानसभेत राष्ट्रवादीचे ५३ आमदार आहेत. अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे दोन माजी मंत्री तुरुंगात असल्याने मतदानाला येऊ शकणार नाहीत. काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. सोमवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत विधानभवनात मतदान होईल. या निवडणुकीत विधानसभेचे सदस्य, लोकसभा व राज्यसभेचे खासदार हेही मतदार असतात.

राष्ट्रपती निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नियुक्त निवडणूक निरीक्षक तथा केंद्र शासनाचे अतिरिक्त सचिव अमित अग्रवाल यांनी रविवारी विधानभवनातील सेंट्रल हॉल येथे स्थापन केलेल्या मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी स्ट्राँग रूमलाही भेट दिली. त्याचबरोबर सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी तयारीची माहिती घेतली. यावेळी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विधिमंडळाचे प्रधान सचिव तथा राष्ट्रपती निवडणूक २०२२ चे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत आदी अधिकारी हजर होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *