काही जिल्ह्यांत निर्बंध शिथिल : मुख्यमंत्री

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ! मुंबई – सोमवारपासून लॉकडाउनमधून काही उद्योग-व्यवसाय सशर्त सुरू करण्यास माफक मुभा देण्यात आली असली; तरी जिल्ह्यांच्या सीमा मात्र सीलबंद राहतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. माझे काही निर्णय कटू असले आणि त्यामुळे मला वाईटपणा आला; तरी राज्याच्या भल्यासाठी मी तो स्वीकारायला तयार आहे, असे ते म्हणाले. पुणे-मुंबईसारख्या रेड झोनमध्ये वृत्तपत्रांच्या स्टॉल्सना परवानगी देण्यात आली असली; तरी घरोघरी वृत्तपत्र टाकायला बंदी घालण्यात आली आहे. हा निर्णय घेतल्यावर कुणी मला वाईट म्हटले तरी चालेल; पण जनतेच्या भल्यासाठी वाईटपणा घेण्याची आपली तयारी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. वृत्तपत्रांसंदर्भात उर्वरित महाराष्ट्रासाठी दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सोमवारपासून काही जिल्ह्यांतील उद्योग-व्यवसाय आणि अन्य व्यवहार सुरू करण्यास केंद्र सरकारसह राज्याने मान्यता दिली आहे. मात्र, ही सवलत देताना काही अटींचे पालन करावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमातून संवाद साधला.

यावेळी बोलताना संयम, धैर्य, जिद्दीने न दिसणार्‍या शत्रूशी लढणार्‍या जनतेचे कौतुक करताना खासगी डॉक्टरांनी कोरोना रुग्णांच्या म्हणजे किडनी किंवा इतर विकार असलेल्या रुग्णांवरील उपचारासाठी दवाखाने खुले ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. लोकांनी सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे कोणी आपल्याला वाळीत टाकण्याच्या भीतीने लपवू नयेत. घरी उपचार न करता फीव्हर क्लिनिकला भेट द्या, कोरोनाचे निदान वेळेत झाल्यास त्यातून पूर्णपणे बरे होता येते, सहा महिन्यांच्या चिमुकलीपासून ऐंशी वर्षांच्या वृद्धापर्यंत अनेकजण बरे झाले आहेत, असा दिलासा ठाकरे यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Facebook
  • X (Twitter)
  • LinkedIn
  • Mix
  • More Networks
Copy link