महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – पुणे :- येथील काही आयटी आणि बीपीओ कंपन्यांनी व्यवस्थापन अधिनियम आणि साथीच्या कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन करीत सुमारे ४०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकल्यामुळे एनआयटीईएसने आता पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे धाव घेतली आहे. येथील विविध आयटी, आईटीएस, बीपीओ, केपिओच्या कर्मचाऱ्याकडून अनेक तक्रारी आल्याची माहिती राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कर्मचारी सेनेचे (एनआयटीईएस) अध्यक्ष रघुनाथ कुचिक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
एनआयटीईएसने आयटी, आईटीएस आणि संबंधित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी आणि हितासाठी काम करीत आहे. लॉकडाउन कालावधी दरम्यान बऱ्याच कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. यामध्ये कॅपजेमिनी सारख्या कंपन्या कर्मचाऱ्यांना तातडीने राजीनामा देण्यास भाग पाडत आहे. तसेच मगरपट्टा, फुरसुंगी (हडपसर) येथील अँमडॉक्स बीपीओ विक्रेते :- क़्वीस कॉर्प, इजेस्ट, एचसीएल, बीपीओ आणि कोलेब्रा यासारख्या अनेक कंपन्यांचा यात समावेश आहे. ज्यांनी ४०० हुन अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे.यामुळे महाराष्ट्रातील आयटी क्षेत्र व कर्मचाऱ्यांची वेतन आणि नोकरी धोक्यात आहे.
लॉकडाउनच्या काळात केंद्र आणि राज्य सरकार कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचे व पगाराचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करीत आहे. तर विविध आयटी, आईटीएस, बीपीओ, केपिओ कंपन्यांच्या व्यवस्थापनाने कायदेशीर तरतुदीच्या पूर्णपणे विरोधात आणि बेकायदेशीर कार्य केले आहे. त्यामुळे विविध आयटी, आईटीएस, बीपीओ, केपिओ कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन कमी न करण्याचे व त्यांना कामावरून कमी न करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी कुचिक यांनी केली आहे.
एनआयटीईएसने या आयटी, आईटीएस, बीपीओ, केपिओ, कंपन्या विरोधात कामगार उपायुक्त कार्यालयाकडे तक्रार केली आहे. त्याची दखल घेत कामगार उपायुक्त कार्यालयाने संबंधित आयटी कंपन्यांना यासंदर्भात नोटीसा बजावल्या आहेत.