महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – उस्मानाबाद- विशेष प्रतिनिधी – आकाश शेळके – जिल्हयात 2019 – 20 मध्ये एफ.सी.आय मार्फत तूर व हरभरा खरेदी करण्यासाठी 11 खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी फक्त उस्मानाबाद, गुंजोटी व कानेगाव या तीनच ठिकाणी आपल्या कार्यालयामार्फत ग्रेडर ( प्रतिनिधी ) पाठविण्यात आले असल्याने फक्त याठिकाणी खरेदी चालू आहे. मात्र जिल्हयातील अन्य दस्तापूर, नळदुर्ग, कळंब, ढोकी, वाशी, भूम, तुळजापूर व लोहारा येथील खरेदी केंद्रावर टेक्नीकल ग्रेडर (प्रतिनिधी) नसल्यामुळे या ठिकाणी खरेदी बंद आहे.
आजपर्यंत उस्मानाबाद जिल्हयातील 15,124 शेतकऱ्यांनी हरभरा खरेदी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे व यामध्ये आणखीन वाढ होणार आहे. व जिल्हयातील तूर खरेदीसाठी 5361 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यापैकी फक्त 921 शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यात आली आहे. खरीप हंगाम अगदी दोन महिन्यांवर येवून ठेपला असून खरीप हंगाम मशागतीसाठी शेतकऱ्यांना बी.बियाणे औषध खरेदी व इतर शेती कामासाठी पैश्यांची नितांत आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे तूर व हरभरा खरेदी हि तात्काळ होवून खरीप हंगामापूर्वी पैसे मिळणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा शेतकऱ्यांसमोर उपासमारीची वेळ येणार आहे. सध्या देशभर कोरोना या महामारीचे संकट चालू असल्याने शेतकरी या आधीच अडचणीत सापडला आहे.
तरी उस्मानाबाद जिल्हयातील दस्तापूर , नळदुर्ग , कळंब , ढोकी , वाशी , भूम , तुळजापूर व लोहारा याठिकाणी खरेदी केंद्रावर टेक्नीकल ग्रेडर ( प्रतिनिधी ) पाठवून तूर व हरभरा खरेदी तात्काळ सुरु करावी. मा. राकेश कुमार रंजन, ए.जी.एम एफ.सी.आय, मुंबई व मा विनय कुमार विभागीय व्यवस्थापक, एफ.सी.आय, पुणे यांच्या कडे पत्रा द्व्यारे मागणी करण्यात आली आहे.