पिंपरी : खासदार बारणे जिथे जातात, तो पक्ष संपवतात ; बारणे, आढळरावांच्या निषेधार्थ पिंपरीत शिवसेनेचे आंदोलन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ जुलै । शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याच्या निषेधार्थ शहर शिवसेनेच्या वतीने गुरुवारी पिंपरीत आंदोलन करण्यात आले. यावेळी बारणे व आढळरावांच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली.खासदार श्रीरंग बारणे गद्दार आणि अपशकुनी आहेत. ते ज्या पक्षात जातात, तो पक्ष संपवतात, अशी टीका शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन भोसले यांनी गुरुवारी केली. शिंदे गटाला पिंपरी चिंचवड शहरात काहीही स्थान नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

भोसले म्हणाले की, बारणे आणि आढळराव गद्दार आहेत. शिवसैनिकांनी स्वतःच्या घरादाराकडे दुर्लक्ष करून त्यांना निवडून दिले. शिवसेनेचे नेते म्हणून त्यांनी वारेमाप संपत्ती गोळा केली. ती बाहेर येऊ नये, यासाठीच त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली आहे. शिवसैनिकांचा विश्वासघात करणाऱ्या खासदार बारणे यांना पुढील काळात त्यांची लायकी कळेल. बारणे यांचा शिवसेनेला काडीचाही उपयोग नव्हता. बारणे अपशकुनी आहेत. ते काँग्रेसमध्ये होते, तेव्हा शहरातील काँग्रेस संपली. शिवसेनेत आले, तेव्हा शिवसेनेचे नगरसेवक कमी झाले. ते आता एकनाथ शिंदे गटात गेले आहेत. तो गटही संपल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका भोसले यांनी केली.

या आंदोलनात अनंत कोऱ्हाळे, निलेश मुटके, रोमी संधू, विशाल यादव, युवराज कोकाटे, तुषार नवले, पांडुरंग पाटील, युवराज कोकाटे, भाविक देशमुख आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *