महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे- विशेष प्रतिनिधी – पुण्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर काल केंद्रीय पथकाने देखील पुण्यात येऊन विविध यंत्रणांसोबत बैठक घेतली. पुणे जिल्ह्यात काही उद्योगांना काम करायला परवानगी दिल्याने पुणे आणि पिंपरी चिंचवडमधून जिल्ह्यात कुणी जाऊ नये यासाठी शहरांच्या हद्दी, सीमा सील करण्यात आल्या आहेत. पुणे शहरात 10 ते 2 या वेळेतच भाजीपाला, किराणा, दूध या सारख्या जीवनावश्यक सुविधा पुरवणाऱ्या सेवा सुरू राहणार आहेत. तर बँका 10 ते 1 उघड्या असतील. औषधाची दुकाने आणि रुग्णालये यावर मात्र निर्बंध नाहीतदेशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पुणे शहर हॉटस्पॉट ठरलं होतं. पहिला रुग्ण सापडून 40 दिवस लोटल्यानंतरही पुणे जिल्ह्यातील रुग्णांच्या संख्येत अजूनही वाढ होत आहे. मात्र या सगळ्यात एक दिलासादायक बाबही समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील तब्बल 83 हून अधिक रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर निदान झाल्यास आणि योग्य उपचार झाल्यास कोरोनालाही हरवता येऊ शकतं, हे पुणेकरांनी सिद्ध केलं आहे.
एकीकडे, कोरोना रुग्ण बरे होत असल्याची माहिती समोर येत असले तरीही पुणेकरांना गाफील होऊन चालणार नाही, असं दिसतंय. कारण पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा वाढू लागला आहे. काल पुणे जिल्ह्यात दिवसभरात 87 रुग्ण आढळून आले. यात एकट्या पुणे शहरात 65 रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत.