राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार ; तीन ते चार दिवसांत मध्यम ते जोरदार पाऊस पडणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ जुलै । राज्यभरात दडी मारून बसलेला पाऊस आता पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. येत्या तीन ते चार दिवसांत राज्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार असून, शनिवारसह रविवारी पावसाचा प्रभाव थोडा अधिक राहील, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. कोकणात पावसाचा जोर थोडा अधिक राहील, असेही त्यांनी सांगितले.

गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली असली, तरी मुंबईकडे मात्र पावसाने पाठ फिरविली आहे. मुंबईवर दाटून येणारे ढग गर्दी करत असले, तरी प्रत्यक्षात पाऊस हुलकावणी देत आहे.

२३ आणि २४ जुलै : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल; शिवाय मुसळधार पावसाची शक्यता आहे.

या जिल्ह्यांना इशारा

२३ जुलै : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली.

२४ जुलै : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, नाशिक, नंदुरबार, जळगाव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *