✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १७ डिसेंबर २०२५ | भाजपने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला सोबत न घेण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आणि राजकारणात शांतता नांदेल, असा गैरसमज झाला असेल तर तो अवघ्या २४ तासांत दूर झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक जाहीर होताच महायुतीचा नवा आराखडा मांडला, पण त्यावर पहिली जोरदार प्रतिक्रिया अजित पवारांकडूनच आली. “तुमचा निर्णय मान्य, पण मैदान आमचं,” अशा थाटात अजितदादांनी पुण्यात ताकद दाखवायला सुरुवात केली आणि राजकीय रंगमंचावर खरी धावपळ सुरू झाली.
महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजताच आचारसंहिता लागू झाली आणि अजित पवार थेट मैदानात उतरले. गणेश कला क्रीडा मंचपासून सेनापती बापट रोडवरील बारामती होस्टेलपर्यंत बैठकींचा धडाका सुरू झाला. रात्री साडेदहा वाजेपर्यंत आणि सकाळी सातपासून पुन्हा बैठकांचा सिलसिला—ही फक्त तयारी नव्हती, तर शक्तिप्रदर्शन होतं. पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक प्रभागात इच्छुकांच्या मुलाखती घेत अजित पवारांनी स्पष्ट संदेश दिला : स्वतंत्र लढाई म्हणजे केवळ घोषणा नाही, तर कृती आहे.
या २४ तासांत राजकीय स्थलांतराचा वेग पाहता पुण्याचं राजकारण रेल्वे स्थानकासारखं वाटावं, अशी परिस्थिती निर्माण झाली. भाजपसह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. माजी नगरसेविका सीमा सावळे, अश्विनी जाधव, संतोष जाधव, शिवसेनेच्या रुपाली आल्हाट, नेताजी काशीद, साधना काशीद, प्रमोद कुटे, तुषार सहाणे, सचिन भोसले—ही यादी पाहता ‘एक-दो नहीं, पूरी फेहरिस्त’ असं चित्र दिसतं. विशेषतः तीन वेळा नगरसेविका आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष असलेल्या सीमा सावळे यांचा प्रवेश हा भाजपसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा धक्का मानला जातो.
“माझं सर्वस्व पणाला लावेन, पण पिंपरी-चिंचवड जिंकूनच दाखवेन,” या अजित पवारांच्या वक्तव्याला आज कृतीची जोड मिळाली आहे. भाजपने युती तोडण्याची घोषणा केली, पण त्यानंतर लगेचच अजित पवारांनी थेट भाजपलाच लक्ष्य करत राजकीय आघाडी उघडली. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ही निवडणूक केवळ पक्षांची नाही, तर प्रतिष्ठेची आणि वर्चस्वाची लढाई ठरणार, हे आता स्पष्ट आहे. “निर्णय एका व्यासपीठावर जाहीर झाला, पण त्याची खरी घोषणा दुसऱ्याच व्यासपीठावर कृतीतून झाली!”
