दर मिनिटाला ५०० गुन्हे… सायबर चोरांची ‘डिजिटल दंगल’; अव्वल महाराष्ट्र!

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १७ डिसेंबर २०२५ | देशात घड्याळाचा काटा पुढे सरकतो, तसतसे सायबर गुन्ह्यांचे आकडेही सरकत नाहीत, तर उड्या मारत वाढत आहेत. भारतीय डेटा सुरक्षा परिषद (डीएससीआय) च्या अहवालानुसार देशात दर मिनिटाला ५०० हून अधिक सायबर गुन्हे घडत आहेत. म्हणजेच मोबाईलमध्ये एक नोटिफिकेशन येईपर्यंत कुणाचा तरी खिसा रिकामा झालेला असतो. ऑनलाइन फसवणूक, डेटा चोरी, हॅकिंग यांचा सुकाळ झाला असून या डिजिटल गुन्हेगारीत महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आहे. दुसऱ्या स्थानी गुजरात, तर तिसऱ्या स्थानी देशाची राजधानी दिल्ली आहे. ‘आर्थिक राजधानी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राने आता ‘सायबर फसवणुकीची राजधानी’ हा शिक्का बसण्याची वेळ येऊ नये, एवढीच अपेक्षा.

सायबर गुन्हे वाढत असतानाच दुसरीकडे सायबर सुरक्षेचा उद्योग मात्र वेगाने फोफावत आहे. भारतात सायबर सुरक्षा उत्पादने बनवणाऱ्या कंपन्यांची संख्या आता ४०० च्या पुढे गेली आहे. गेल्या पाच वर्षांत या क्षेत्रात सरासरी ३४ टक्के वाढ झाली आहे. २०२० मध्ये या उद्योगाचा वार्षिक व्यापार १.०५ अब्ज डॉलर इतका होता, तो २०२६ पर्यंत थेट ६ अब्ज डॉलरपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. म्हणजे एकीकडे चोर वाढत आहेत, तर दुसरीकडे कुलूप बनवणाऱ्यांचाही धंदा तेजीत आहे— , “चोरी वाढली म्हणून कुलूप सोन्याचं झालं!”

या कंपन्यांचा फोकस केवळ देशापुरता मर्यादित नाही. अहवालानुसार तब्बल ५५ टक्के भारतीय सायबर सुरक्षा कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारात कार्यरत आहेत. अमेरिका, पश्चिम आशिया आणि दक्षिण-पूर्व आशियातील देश हे त्यांचे प्रमुख ग्राहक आहेत. मात्र, गंमत अशी की केवळ १७ टक्के कंपन्यांची परदेशात थेट कार्यालये आहेत. उरलेल्या कंपन्या भारतातूनच ‘ग्लोबल सिक्युरिटी’ सांभाळत आहेत. म्हणजे घरात बसून जगभरच्या डिजिटल दरवाजांना कुलूप लावण्याचं काम सुरू आहे.

दरम्यान, सायबर गुन्ह्यांचे आकडे अंगावर काटा आणणारे आहेत. सायबर सुरक्षा कंपनी सीक्राइटच्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२४ ते सप्टेंबर २०२५ या अवघ्या एका वर्षात २६.५५ कोटी सायबर घटना उघडकीस आल्या. म्हणजे सरासरी दर मिनिटाला ५०५ गुन्हे. कर्नाटक, दिल्ली-एनसीआर आणि महाराष्ट्र ही सायबर सुरक्षेची मोठी बाजारपेठ असली, तरी गुन्ह्यांत महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्ली आघाडीवर आहेत. प्रश्न इतकाच आहे—डिजिटल भारतात आपण स्मार्ट होत चाललो आहोत की फसवणुकीसाठी अधिक सोपे लक्ष्य बनत चाललो आहोत?

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *