महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ जुलै । भारताचा ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत दमदार कामगिरी करत रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं आहे. अंतिम फेरीत ८८.१३ मीटर लांब भालाफेक करत नीरजने भारतासाठी पदक निश्चित केलं. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारा तो अंजू बॉबी जॉर्जनंतर फक्त दुसरा भारतीय ठरला आहे. या स्पर्धेत ग्रेनडाच्या अँडरसन पीटर्स याने ९०. ५४ मीटर फेक करत सुवर्णपदक पटकावलं आहे.
अंतिम फेरीत नीरज चोप्राची सुरुवात निराशाजनक झाली होती. सामन्याला सुरुवात झाल्यानंतर नीरजचा पहिलाच प्रयत्न ‘फाउल’ ठरला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने ८२.३९ मीटर भाला फेकला, तर तिसऱ्या प्रयत्नात नीरजने आपल्या कामगिरीत आणखी सुधारणा करत ८६.३७ मीटरपर्यंत मजल मारली. मात्र नीरजने चौथ्या प्रयत्नात ८८.१३ मीटर लांब फेक करत थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. त्यानंतर नीरज चोप्राचा पाचवा प्रयत्नही ‘फाउल’ ठरला. मात्र चौथ्या प्रयत्नावेळी त्याने केलेली ८८.१३ मीटर फेक टर्निंग पॉईंट ठरली आणि भारताला रौप्य पदक मिळालं.
It's a historic World Championship Medal for #India 🇮🇳
Olympic Champion Neeraj Chopra wins Silver Medal in men's Javelin Throw final of the #WorldAthleticsChamps with a throw of 88.13m
Congratulations India!!!!!!! pic.twitter.com/nbbGYsw4Mr
— Athletics Federation of India (@afiindia) July 24, 2022
दरम्यान, अंतिम फेरीत भारताचा दुसरा भालाफेकपटू रोहित यादव याच्या पदरी निराशा आली असून त्याला पदक मिळवण्यात अपयश आलं आहे.