महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ जुलै । शिवसेनेविरोधात बंडखोरी करुन भाजपसोबत हात मिळवणी केलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट मनसेत विलीन होणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल 40 शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांनी बंडखोरी केल्याने मुख्य शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे. शिवसेनेच्या या आमदारांविरोधात महाविकास आघाडीने सुप्रीम कोर्टात अपात्र ठरवण्याविषयी याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. शिंदे गटाला कोर्टात आणि निवडणूक आयोगापुढे आपणच खरी शिवसेना असल्याचं सिद्ध करावं लागेल किंवा त्यांच्या गटाला दुसऱ्या पक्षात विलीन होण्याचा पर्याय उपलब्ध असेल अशी चर्चा आहे. या चर्चेसोबत शिंदे गट मनसेत विलीन होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. या चर्चांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: उत्तर दिलं आहे.
राज ठाकरे यांनी आज ‘झी 24 तास’ वृत्तवाहिनीला रोखठोक मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राज्याच्या सध्याच्या घडामोडींवर आपली रोखठोक भूमिका मांडली. यावेळी त्यांना शिंदे गटाला मनसेत सामील करुन घ्याल का किंवा विलीन केलं तर चालेल का? अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी आपण त्याबद्दल विचार करु, असं स्पष्ट उत्तर दिलं. याचा अर्थ राज ठाकरे शिंदे गटाला मनसेत समाविष्ट करुन घेण्यासाठी सकारात्मक असल्याचं चित्र आहे.
“शिंदे गटाकडून तसा प्रस्ताव आल्यास नक्की विचार करू”, असं राज ठाकरे म्हणाले. “40 आमदारांचं विलिनीकरण हा तांत्रिक मुद्दा आहे. अनेक वर्तमानपत्रांमध्ये मी हा विषय वाचला. त्या आमदारांकडून विलिनीकरणाचा प्रस्ताव आला तर मी नक्कीच विचार करेन”, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. इतके आमदार पक्षात आले तर मनसे कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होईल का? असा प्रश्न राज यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर माझ्यासाठी आधी मनसैनिक. बाकीचे नंतर, असं उत्तर त्यांनी दिलं.
राज ठाकरे यांनी या मुलाखतीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. “तो माणूस बोलतो वेगळं आणि करतो वेगळं, विश्वास ठेवण्यासारखं काही नाहीय. मला त्या बाकिच्या लोकांबद्दल वाईट वाटतंय. पण हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाहीय”, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. आख्ख्या देशाला, महाराष्ट्राला माहिती नाही, इतक्या जवळून उद्धव ठाकरे आपल्या माहिती असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला.