महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जुलै । मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर राज्यातील धनगर समाजातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा रविवारी विशेष सन्मान करण्यात आला. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात हा सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यात राज्याच्या कानाकोपऱ्यातून धनगर समाजाची लोकं सहभागी झाली होती.
“मी सर्व आमदारांना सांगितले आहे की तुम्ही ५० जण मुख्यमंत्री आहात. जे लोक मला भेटत आहेत त्या सगळ्यांनाच वाटत आहेत आहे की आम्ही मुख्यमंत्री आहोत. एकनाथ शिंदे हा सर्वांचाच मुख्यमंत्री आहे. बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या आशिर्वादाने आम्ही युतीचे सरकार स्थापन केले आहे. अडीच वर्षांपूर्वी भाजपा शिवसेना सरकार आले नाही पण आता ती दुरुस्ती आम्ही केली आहे,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
“काही लोकांना वाटत होतं की आमचाच अधिकार आणि हक्क आहे. आता मी उभा आहे पण माझ्या मागे मोठी राजकीय पार्श्वभूमी नाही. पण एक सामान्य कार्यकर्ता देखील मुख्यमंत्री होऊ शकतो हे जनतेने पाहिलं आहे. बाळासाहेबांच्या विचाराने मी प्रेरित झालो. आनंद दिघे यांच्या सहवासात काम करण्याची संधी मिळाली,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.
“या राज्याचा मुख्यमंत्री होईन यावर मलाही विश्वास नव्हता. सुरुवातीला तीन चार दिवस झोपलोच नाही. कारण खूप मोठा कार्यक्रम हातात घेतला होता. नाहीतर आमचाच कार्यक्रम झाला असता. पण परमेश्वर पाठीशी होता. ५० लोक एकत्र आले. काही लोक गद्दार म्हणतात पण आम्ही क्रांती केलेली आहे. आमच्या क्रांतीची दखल जगभरातील ३३ देशांनी घेतली आहे,” असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
“लोकांना तिथे जबरदस्ती पकडून ठेवल्याचे सांगायचे. पण तिथे तर आम्ही वाढदिवस साजरे करत होतो. सगळे आनंदात होतो. राज्यातील जनतेच्या आशिर्वादाने बाळासाहेबांच्या विचारांची लढाई लढलो आणि जिंकलो. शिवसेना भाजप युतीच्या राज्याला पंतप्रधान मोदींनी साथ दिली आहे,” असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
“तुमचा भाऊ मुख्यमंत्री झाला आहे त्यामुळे तुमच्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये मी नक्की हात घालणार आहे. न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करायचे आहे ते नक्कीच आमच्याकडून होईल,” असेही एकनाथ शिंदे म्हणाले.