महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ जुलै । शिवसेना आणि धनुष्यबाण हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मात्र त्याच शिवसेनेवर आज पुरावे सादर करण्याची वेळ आली आहे. मात्र एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत वेगळे निघालेल्या आमदार-खासदारांनी आता पक्ष आणि पक्ष चिन्हावर दावा केला आहे. त्यामुळे याबाबत निर्णय आता निवडणूक आयोग घेणार आहे. पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिंदे गटाला पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहे. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, आपला कायद्यावर विश्वास आहे. सत्याचा विजय होईल. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये दिलेल्या मुलाखतीत याबाबत सविस्तर भाष्य केलं आहे.
जे काही सुरु आहे ते दुर्दैवी आहे. माझा अजूनही देशाच्या घटनेवर भरवसा आहे, कायद्यावर भरवसा आहे. चोरी-मारी सगळीकडेच चालते असं माझं अजिबात मत नाही. सत्यमेव जयते, नाहीतर हे वाक्य तुम्हाला पुसावं लागेल आणि मग एकाची दोन वाक्यं करावी लागतील. एकतर ‘असत्यमेव जयते’ आणि दुसरं वाक्य ‘सत्तामेव जयते.’ त्यामुळे सत्तामेव जयतेपुढे तुम्ही असत्य घेऊन जर काही करणार असाल तर ते लोक खपवून घेणार नाहीत.
शिवसेनेचे आमदार आणि खासदार फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. आपल्याकडे 50 आमदार आणि 12 खासदार असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. आता केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहुमत सिद्ध करण्याचे लेखी पुरावे मागितले आहेत.