महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ जुलै । एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारांना वेगळं करीत शिंदे गटाची स्थापना केली. यानंतर गेल्या अनेक दिवसात शिवसेनेतील आमदार, खासदारांसह अनेक पदाधिकारी शिंदे गटात गेले आहे. पक्ष वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रभरात संवाद यात्राही काढली. मात्र तरीही पक्षातील गळती सुरूच आहे.
शिवसेनेपाठोपाठ आता युवासेनेतही राज्यभरात उभी फूट पडल्याचं दिसून येत आहे. राज्यभरातील युवासेनेचे 40 वरिष्ठ पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना हा मोठा धक्का आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी शिंदे गटात गेले आहेत.
एकनाथ शिंदेंना शिवसेना पक्ष आणि पक्षाचं चिन्ह हवं असेल तर निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार पक्षातील उभी फूट दाखवणं आवश्यक आहे. ही फूट पक्षातील खासदार, आमदारांसह शेवटच्या टोकापर्यंत दाखवणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदेनी आमदारांसह बाहेर पडल्यापासून गेल्या अनेक दिवसात मोठ्या संख्येने शिवसैनिक शिंदे गटात जात आहेत. त्यात आता युवासेनेलाही हा मोठा धक्का आहे.